‘दोन दिवस थांबा, कामाला लागा, थांबा... संधी देऊ, निश्ंिचत राहा’
By Admin | Updated: September 17, 2014 00:37 IST2014-09-17T00:36:48+5:302014-09-17T00:37:46+5:30
शरद पवारांचा कानमंत्र : बंद खोलीत चर्चा; कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील दिग्गजांनी घेतली भेट

‘दोन दिवस थांबा, कामाला लागा, थांबा... संधी देऊ, निश्ंिचत राहा’
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज, मंगळवारी कोल्हापूर, सांगली व साताऱ्यातील दिग्गजांनी भेट घेतली. ‘दोन दिवस थांबा, कामाला लागा, थांबा... संधी देऊ, निश्ंिचत राहा’ अशा शब्दांत पवार यांनी भेटीदरम्यान इच्छुकांना कानमंत्र दिला. श्रीमंत शाहू महाराज, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, वाईचे आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने व संग्राम कुपेकर यांच्याशी पवारांनी बंद खोलीत चर्चा केली. भेटीदरम्यान पवारांच्या आश्वासनाच्या डोसामुळे उत्साहित झालेले हसतमुखाने कक्षाबाहेर पडताना दिसत होते.दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी संपर्कातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष व फोनवरून चर्चा केली. पवारांचे ‘डॅमेज कंट्रोल’ची मोहीम आज, मंगळवारी सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत एका हॉटेलवर सुरू होती. पवारांची भेट घेणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीसह कॉँग्रेस व अपक्ष इच्छुकांचाही मोठा भरणा होता. सकाळी सात वाजल्यापासून पवारांनी निरोप दिलेल्या प्रत्येकाचे नाव पुकारून कक्षात प्रवेश दिला जात होता. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या महत्त्वानुसारच पाच मिनिटांपासून अर्धा तास बंद खोलीत पवारांनी चर्चा केली.जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे, उपमहापौर मोहन गोंजारे, प्रा. मच्छिंद्र सकटे, जि. प.चे सदस्य अरुण इंगवले, आर. के. पोवार, पंचायत समितीचे सदस्य राजू सूर्यवंशी, नानासाहेब गाट, आदींसह नगरसेवक, जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
धाकल्या पवारांचा कक्ष ओस पडला
उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पवारांसह एका हॉटेलवर उतरले होते. शरद पवार चौथ्या मजल्यावर, तर अजित पवार व तटकरे तिसऱ्या मजल्यावर उतरले होते. सकाळपासून थोरल्या पवार यांना भेटणाऱ्यांची संख्या जास्त होती.
शिरोळची जागा सोडवून घ्या
‘आपल्या सल्ल्याप्रमाणे शिरोळ तालुक्याचा संपूर्ण सर्व्हे केला आहे. वातावरण अत्यंत पोषक आहे’, असे सांगून जि. प. सदस्य धैर्यशील माने यांनी सर्व्हेचा संपूर्ण अहवाल शरद पवार यांना सादर केला. शिरोळ मतदारसंघ कॉँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे घ्या, निवडून येण्याची माझी क्षमता व तयारी आहे, असे माने यांनी पवारांना सांगितले. याबाबत ‘दोन दिवसांत निर्णय घेऊ’, असे पवार यांनी माने यांना सांगितले.कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मंगळवारी सकाळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भेट घेऊन राजकीय घडामोडींबाबत चर्चा केली.
सतेज पाटील तुम्ही निश्ंिचत राहा
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शरद पवार यांची सकाळी नऊ वाजता भेट घेतली. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. आता महाडिक यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाने ‘दक्षिण’मध्ये निवडणुकीत मदत केली पाहिजे, असे मत सतेज पाटील यांनी पवार यांच्याकडे व्यक्त केले. ‘काळजी करू नका, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीशी राहतील, निश्चिंत राहा’ असा सल्ला पवार यांनी दिला.
टोलप्रश्नी माझ्याशी चर्चा नाही
टोलविरोधी कृती समितीचे निवेदन दोन दिवसांपूर्वी फॅक्सवर मला मिळाले. याप्रश्नी कृती समितीच्या प्रतिनिधींनी माझ्याशी चर्चाही केलेली नाही.
- शरद पवार,
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
पवारांना संघर्ष दिसला नाही का?
बारामती शहरांतर्गत टोलवसुली शरद पवार यांनी तत्काळ बंद केली; पण कोल्हापूरचा टोल विरोधाचा गेले साडेतीन वर्षे सुरू असलेला संघर्ष त्यांना कसा दिसला नाही.
- सदाशिवराव मंडलिक, माजी खासदार