पेणमध्ये मिळणार एक्स्प्रेसला थांबा

By Admin | Updated: February 8, 2015 01:51 IST2015-02-08T01:51:06+5:302015-02-08T01:51:06+5:30

जलद गाड्यांना लवकरच पेण स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी दिली.

Wait for the Express to get in Pen | पेणमध्ये मिळणार एक्स्प्रेसला थांबा

पेणमध्ये मिळणार एक्स्प्रेसला थांबा

पेण : जलद गाड्यांना लवकरच पेण स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी दिली. पेण स्थानकातील अक्षयऊर्जा, रेल्वे सुरक्षा कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते.
पेणमध्ये गणेशमूर्तीच्या कार्यशाळा आणि प्रस्थापित उद्योगामुळे मुंबई-ठाण्यातून अनेक कामगार येतात. हे स्थानक मध्यवर्ती असल्याने अलिबाग-पेण-नागोठणे या औद्योगिक पट्ट्यातील कामगारांसाठीही जलद गाड्यांना येथे थांबा देण्याची मागणी होत होती. त्यासाठी राजकीय पक्ष व प्रवासी संघटना प्रयत्नशील होत्या. त्यांना या घोषणेमुळे दिलासा मिळाला आहे.
पनवेल रोहा ६४ कि.मी. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे त्यांनी सांगितले. रोहा ते सीएसटी सेवा २०१६मध्ये सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकल सेवा सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडे ४०० डब्यांची कमतरता आहे, मात्र यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद होणार असून, ही सेवा सुरू होण्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. रोहा ते पनवेल दुपदरी मार्गाचे काम २०१४ सालीच पूर्ण होणार होते, मात्र अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ते वेळेत होऊ शकले नाही. मात्र ते आता जलदगतीने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पेण रेल्वे स्थानकात व्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांच्यासह विभागातील अधिकारी मुकेश निगम, मुख्य विद्युत अभियंता जी.आर. अग्रवाल, राजीव त्यागी व मध्य रेल्वे प्रशासनाचे साहाय्यक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी पनवेल-रोहा स्थानकांना जोडणाऱ्या आॅप्टीकल फायबर नेटवर्क प्रणाली व मालवाहू रेल्वेमार्गाचे उद्घाटनही सूद यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेना संघटना व ज्येष्ठ नागरिक संघटनाच्या वतीने पेण रेल्वे स्थानकात जलदगती गाड्यांना थांबा मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Wait for the Express to get in Pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.