मुंबई बँकेसाठी उत्साहात मतदान
By Admin | Updated: May 6, 2015 02:02 IST2015-05-06T02:02:55+5:302015-05-06T02:02:55+5:30
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज जोरदार चुरस पाहायला मिळाली.
मुंबई बँकेसाठी उत्साहात मतदान
मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज जोरदार चुरस पाहायला मिळाली. विद्यमान सत्ताधारी सहकार पॅनेल आणि शिवसेना पुरस्कृत शिवप्रेरणा पॅनलने सर्व शक्ती पणाला लावल्याने मुंबईत पहिल्यांदाच सहकारासाठी भरघोस मतदान पाहायला मिळाले.
विद्यमान संचालक आणि भाजपा नेते प्रवीण दरेकरांवर निशाणा साधत शिवसेनेने मुंबई बँकेच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. प्रवीण दरेकरांच्या कार्यकाळात बँकेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहारांचे आरोप शिवसेना आणि भाजपाने केले होते. मात्र, विधानसभेच्या निकालानंतर दरेकरांनी मनसेला सोेडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. दरेकरांच्या निमित्ताने मुंबईतील सहकारात चंचुप्रवेश करण्याची आयती संधी मिळाल्याने भाजपाने दरेकरांना सक्रिय पाठिंबा जाहीर केला. भाजपाने दरेकरांची बाजू घेतल्याने शिवसेनेदेखील आक्रमक प्रचार मोहीम राबविली.
शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनेलच्या प्रचारासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम, खा. अनिल देसाई, आनंदराव अडसूळ, लीलाधर डाके, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकरांना मैदानात उतरविले होते. सहकारी बँकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा विरुद्ध शिवसेना संघर्षही पाहायला मिळाला. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शिवाजीराव नलावडे अशा नेत्यांमुळे भाजपा, राष्ट्रवादी आणि मनसेची एकत्रित सहकार पॅनल आणि विरोधात शिवसेना, असे चित्र पाहायला मिळाले.
शिवप्रेरणा पॅनलने दरेकरांसह विद्यमान संचालकांच्या कार्यकाळातील गैरव्यवहारांचा मुद्दा पुढे केला. तर भाजपामुळेच विधानसभेत बँकेतील गैरव्यवहारांचा मुद्दा चर्चेला येऊ शकला नाही. भाजपा नेत्यांनी स्वत:च केलेल्या आरोपांचा विसर पडल्याची टीका शिवसेना नेत्यांनी केली. तर शिवप्रेरणा पॅनलचा सर्व प्रचार दरेकरांभोवती फिरत राहिला. तसेच पक्षीय राजकारणाचे हिशोब चुकते करण्यासाठी शिवसेना ऐनवेळी सहकाराच्या लढाईत उतरली. त्यामुळे त्यांना दमदार उमेदवारही देता आले नसल्याने सहकार पॅनलच बाजी मारेल, असा दावा सहकार पॅनलकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)