मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी, असे नियोजन राज्य निवडणूक आयोगाने केले असून तसे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे आता १ जुलै २०२५ रोजीच्या मतदार याद्यांमधील सर्व मतदार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मतदान करू शकतील.
जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात आयोगाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी वाघमारे बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती एका टप्प्यात नगरपालिका दुसऱ्या टप्प्यात तर महापालिका निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होईल असे म्हटले जाते.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी जी मतदार यादी होती ती राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयातून गेल्या महिन्यात मागितली होती. त्यावरून या यादीच्या आधारेच मतदान होणार असे म्हटले जात होते. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ पर्यंतच्या याद्या केंद्रीय निवडणूक आयोगास मागितल्या आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदारांची आणि मतदान केंद्रांची संख्या वाढेल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. त्यानंतर १ जुलै २०२५ पर्यंत ज्यांनी मतदार म्हणून नोंदणी केली त्यांनाही आता मतदानाचा अधिकार असेल.