जाहीरनाम्याबाबत मतदार संभ्रमात
By Admin | Updated: October 8, 2014 22:59 IST2014-10-08T22:59:26+5:302014-10-08T22:59:26+5:30
शेकापचे उमेदवार सुभाष तथा पंडित पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांचे जाहीरनामे प्रसिध्द होऊन मतदारांच्या हातात पोचले

जाहीरनाम्याबाबत मतदार संभ्रमात
आविष्कार देसाई, अलिबाग
शेकापचे उमेदवार सुभाष तथा पंडित पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांचे जाहीरनामे प्रसिध्द होऊन मतदारांच्या हातात पोचले, मात्र निवडणूक रिंगणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. महेश मोहिते, भाजपाचे प्रकाश काठे आणि काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांचे जाहीरनामे अद्यापपर्यंत मतदारांपर्यंत पोचलेले नाहीत. त्यामुळे या पक्षांचे विकासाचे व्हिजन काय आहे, याबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
निवडणुकीत निवडून आल्यावर जनतेच्या विकासाबाबत नेमके काय धोरण असेल, दूरदृष्टीने कोणते निर्णय घेण्यात येणार आहेत, याचे चित्र जाहीरनाम्यातून प्रतिबिंबीत करण्यात येते. जाहीरनाम्याच्या माध्यमातून जनतेला येत्या पाच वर्षात नेमके काय देणार आहे, हे थेट सांगण्याचा चांगला मार्ग असून जनतेला आपलेसे करण्याचाही एक मार्ग असतो.
अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना, शेकाप, काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, यासह अन्य पक्ष, तसेच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या जाहीर नाम्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक, महिला, कृषी, उद्योग, पर्यटन, क्रीडा अशा विविध विकासात्मक कामांचा समावेश करण्यात आला आहे. शेकापचे उमेदवार सुभाष पाटील यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेकापने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचण्यात आला असून नारायण नागू पाटील, भाऊसाहेब राऊत, स्वर्गीय दत्ता पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील, आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या कर्तृत्वाची, विकासाची छाप दिसत आहे. निवडून आल्यावर सर्वसमावेशक विकासाचा पॅटर्न राबवून अलिबागचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सुभाष पाटील यांनी आपल्या जाहीरनाम्यात केल्याचे दिसून येते.
काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जाहीरनामे राज्यस्तरावर प्रसिध्द झाले असले तरी, मतदारांपर्यंत ते अद्याप पोचलेले नाहीत.