चुलीचुलीपर्यंत मतदार जागृती!
By Admin | Updated: September 26, 2014 23:42 IST2014-09-26T23:42:21+5:302014-09-26T23:42:21+5:30
विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी साऱ्यांचीच लगीनघाई सुरू झाली आहे.

चुलीचुलीपर्यंत मतदार जागृती!
संजय खांबेटे, म्हसळा
विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी साऱ्यांचीच लगीनघाई सुरू झाली आहे. पक्षकार्यकर्ते प्रचारसभा, आश्वासनांची खैरात करीत असून मतदान जनजागृतीसाठी आता निवडणूक कार्यालय, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही कंबर कसली आहे. नागरिकांच्या, मतदारांच्या केवळ दरवाजावर नाही तर त्यांच्या चुलीचुलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मतदान जनजागृतीच्या माध्यमातून केला जात आहे.
श्रीवर्धन तालुक्यात मतदारांचे मतदान अधिकाधिक व्हावे हा संदेश पोहोचविण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. आज शासनाच्या पुरवठा विभागातर्फे गॅस वितरकांमार्फत घरोघरी गॅस सिलिंडरची डिलिव्हरी देताना मतदान जागृती कार्यक्रमाची पत्रके त्यांच्या स्वयंपाकगृहापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प सहा. निवडणूक निर्णय अधिकारी वसावे यांनी केला. यावेळी नि. ना. तहसीलदार तथा प्र. निवडणूक तहसीलदार धनंजय कांबळे, सर्कल विश्वास गडदे, प्रकाश भोईर, मंगेश पवार, एस. पी. जोंधळे, एस. के. शहा, संदीप मोरे, पी. डी. पागीरे, दत्तू करचे, कृष्णा पाष्टे, सायबू कादरी, अमानुल्ला कादरी उपस्थित होते. तालुक्यातील गेल्या वेळी कमी मतदान झालेल्या बुथवर विशेष जनजागृतीची मोहीम राबविली जाणार आहे. इव्हीएम मशीनबाबत मतदारांना माहिती देणे हा कार्यक्रम असून तालुक्यात सरासरी ८० टक्के मतदान होणे आवश्यक असल्याचे वसावे यांनी सांगितले.