Join us  

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नेमलेल्या पालिका पथकांनाच कामचुकारपणाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 3:25 PM

ह्या प्रत्येक पथकात पालिकेचा लिपिक, शिपाई, सफाई कामगार व ठेक्याचा सुरक्षा रक्षक सह १ पोलीस कर्मचारी असे ५ जणांचा समावेश केला. पथकांचे प्रमुख व नियंत्रण अधिकारी प्रत्येक प्रभाग समिती निहाय नेमण्यात आले.

ठळक मुद्देसंसर्ग झाल्यावर वैद्यकीय यंत्रणा आणि होणारा मोठा खर्च पाहता त्या ऐवजी कोरोनाचा संसर्ग पसरू नये ह्यासाठी जास्तीजास्त खबरदारी घेण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या मागण्या सुद्धा जागरूक नागरिकां कडून सातत्याने होत होत्या

मीरारोड - कोरोना संसर्ग आटोक्यात आण्यासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे  शहर कोरोना मुक्त असावे  हेतूने  मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरात नेमलेली ५७ पथके बेपत्ता झाली आहेत. शहरात सर्रास विना मास्क फिरणाऱ्यांची  उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असून तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता कोरोना रोखण्यासाठी नेमलेल्या या पथकांनाच कामचुकारपणाचा संसर्ग झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.  

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने मीरा भाईंदरमध्ये देखील हाहाकार उडवला होता . सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असतानाच चाचण्यांचे प्रमाणसुद्धा कमी झाले आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर मास्क न घालणे व कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघनाचे प्रमाण वाढले आणि दुसरी लाट आली जी भयावह होती. ऑक्सिजन व रेमडेसिवीर साठी तर रुग्णांच्या नातलगांचा जीव घायकुतीला आला होता. लॉकडाऊन ने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला . अनेकांचे जीव गेले तर अनेकजण कसेबसे बचावले. 

आता सुद्धा दुसरी लाट ओसरली असे जाणवू लागताच बेजबाबदारांची संख्या वाढू लागली आहे. असंख्य सामान्य नागरिकांसह अनेक राजकारणी व लोकप्रतिनिधी देखील बेजबाबदारपणे मास्क न घालताच मोकाट सुटलेले आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात असताना हा बेजबाबदारपणा रुग्ण संख्या वाढून पुन्हा लॉकडाऊन कडे नेऊ शकतो अशी दात शक्यता वर्तवली जात आहे. जेणेकरून वैद्यकीय सेवा, पालिका व पोलीस आदी यंत्रणांवर पुन्हा मोठ्या प्रमाणावर ताण पडू शकतो . 

संसर्ग झाल्यावर वैद्यकीय यंत्रणा आणि होणारा मोठा खर्च पाहता त्या ऐवजी कोरोनाचा संसर्ग पसरू नये ह्यासाठी जास्तीजास्त खबरदारी घेण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या मागण्या सुद्धा जागरूक नागरिकां कडून सातत्याने होत होत्या. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी एप्रिल महिन्यात तब्बल ५७ गस्ती पथके शहरात नेमली. 

ह्या प्रत्येक पथकात पालिकेचा लिपिक, शिपाई, सफाई कामगार व ठेक्याचा सुरक्षा रक्षक सह १ पोलीस कर्मचारी असे ५ जणांचा समावेश केला. पथकांचे प्रमुख व नियंत्रण अधिकारी प्रत्येक प्रभाग समिती निहाय नेमण्यात आले. ह्या पथकांनी त्यांच्या प्रभागात सतत गस्त घालण्यासह कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व गरज पडल्यास फौजदारी कारवाई करायची होती. विना मास्क वा मास्क नीट घातलेला नसेल, गर्दी केली असेल, बंदी असून देखील दुकाने-आस्थापना खुली असेल, फेरीवाले बसले असतील किंवा अन्य नियमांचे उल्लंघन होत असेल तर अश्यांवर ठरवून दिलेल्या दंडा नुसार कारवाई पथकांनी करायची होती. 

परंतु गेल्या महिन्या भरा पेक्षा जास्त काळा पासून ह्या पथकांचे कुठे अस्तित्वच जाणवत नाही. एरव्ही सदर पथकांनी अमुक कारवाई केली म्हणून दिली  प्रसिद्धी पत्रके सुद्धा पालिके कडून बंद झाली आहेत . शहरात विना मास्क फिरणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांचा बेशिस्तपणा प्रचंड वाढला असून पालिका मुख्यालयात सुद्धा मास्क न घालता फिरणारे अनेकजण मोकाट आहेत. मास्क नाही तर प्रवेश नाही ह्या स्टिकर आदींवर खर्च केलेले पैसे वाया गेले आहेत. 

मास्क घालणे बंधनकारक असूनही अनेक लोक मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणे, आस्थापना, दुकाने, फेरीवाले, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या आदी सर्वत्र वावरतात. भाज्या-मासळी आदी खरेदीसाठी प्रचंड गर्दी करणे, खाण्या-पिण्याच्या ठिकाणीसुद्धा गर्दी असते. गणेशोत्सवात तर सार्वजनिक मंडळांसह मूर्ती स्वीकृती केंद्र व विसर्जन ठिकाणी सुद्धा सर्रास मास्क न घालणारे मोकाट आहेत. कोरोना संसर्ग पसरण्यास नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याचे महत्वाचे कारण असल्याने लोकांचा बेशिस्तपणा रोखण्यासाठी कारवाईचा कठोर बडगा उगारणे गरजेचे आहे . परंतु त्यासाठी नेमलेली पथकेच दिसेनासी झाली असून त्यावर पालिका आणि राजकारणी सुद्धा चिडीचूप आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमीरा-भाईंदर