व्हॉट्सअॅपवर व्हर्च्युअल वटपौर्णिमेची धम्माल!
By Admin | Updated: June 3, 2015 04:15 IST2015-06-03T04:15:56+5:302015-06-03T04:15:56+5:30
सगळेच सण-उत्सव व्हॉट्सअॅपवर साजरे करण्याचा अनोखा ट्रेंड सेट झाला आहे. मग वटपौर्णिमा त्याला अपवाद कशी ठरू शकेल?

व्हॉट्सअॅपवर व्हर्च्युअल वटपौर्णिमेची धम्माल!
मुंबई : सगळेच सण-उत्सव व्हॉट्सअॅपवर साजरे करण्याचा अनोखा ट्रेंड सेट झाला आहे. मग वटपौर्णिमा त्याला अपवाद कशी ठरू शकेल? त्यामुळेच मंगळवारी दिवसभर व्हॉट्सअॅपवर वड, नवरा-बायको अन् सात जन्म या आशयावर आधारलेले खुमासदार मेसेजेस आणि फोटोस् शेअर केले गेले. त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या पारंपरिक पद्धतीला छेद देत झाडे लावा, फांद्या कापू नका, असे सामाजिक संदेशही फॉरवर्ड झाले.
वटपौर्णिमेच्या व्हर्च्युअल फिव्हरमध्ये ‘सकाळी सकाळी बायकोने विचारले एवढं गालातल्या गालात का हसताय?.. आता तिला काय सांगू की हा सातवा जन्म आहे म्हणून...’ या मेसेजने एकच धम्माल उडविली. शिवाय, ‘सात जन्म एकच नवरा मिळावा असे जिला वाटते ती वटसावित्री, एका जन्मात सात नवरे मिळावे असे जिला वाटते ती चावटसावित्री’, ‘समस्त नवरे मंडळींना हिंदू नवरा लायसन्स रिन्यूव्हल डेच्या हार्दिक शुभेच्छा’ आणि ‘बायको कुणालाही गुंडाळू शकते... वडाच्या झाडालाही सोडत नाहीत’ अशा एक ना अनेक मेसेजची दिवसभर व्हॉट्सअॅपवर रीघ सुरू होती.
व्हॉट्सअॅपवर बऱ्याच
सावित्रींनी आपले स्टेट्स आणि डीपीसुद्धा ‘स्पेशली’ अपडेट्स केलेले दिसले. तर काही सावित्रींनी मात्र वटपौर्णिमेच्या चाकोरीबद्धतेला छेद देऊन झाडांच्या फांद्या न तोडता वृक्षारोपण केले. यानिमित्ताने व्हॉट्सअॅपकरांनी झाडे न तोडण्याचे आवाहनही केले. (प्रतिनिधी)