मुरुडच्या आझाद चौकात राष्ट्रभक्तीपट गीतांचा उमटला स्वर
By Admin | Updated: January 27, 2015 22:47 IST2015-01-27T22:47:11+5:302015-01-27T22:47:11+5:30
मुरुड शहरात पहाटेपासूनच चौकाचौकातून मेरा रंग दे बसंती चोला, मेरी देश की धरती, ए मेरे वतन के लोगो... यासारखी राष्ट्रभक्तीपर गीते परिसरात ऐकायला मिळत होती.

मुरुडच्या आझाद चौकात राष्ट्रभक्तीपट गीतांचा उमटला स्वर
मुरुड : मुरुड शहरात पहाटेपासूनच चौकाचौकातून मेरा रंग दे बसंती चोला, मेरी देश की धरती, ए मेरे वतन के लोगो... यासारखी राष्ट्रभक्तीपर गीते परिसरात ऐकायला मिळत होती. सर.एस.ए. हायस्कूल, अंजुमन इस्लाम, नगरपरिषद शाळा, आय.टी.आय., नविकेताज हायस्कूल, सुविद्या स्कूल आदी शाळांमध्ये तसेच बँका, पतसंस्था, शासकीय - निमशासकीय संस्थामध्ये ध्वजवंदन केल्यानंतर आझाद चौकात नगराध्यक्ष रहीम कबले यांच्या हस्ते हजारोंच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या.
या प्रसंगी शहरातील विशेष प्रावीण्यप्राप्त व्यक्तींसह नगरपरिषद कर्मचाऱ्यातील सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर शासकीय मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाला तमाम मुरुडकरांनी उपस्थिती दर्शवली. तहसीलदार एल.डी.गोसावी यांनी ध्वजाला मानवंदना दिली. पोलीस दल, वन खाते तसेच होमगार्ड्सनी गणवेशात संचलन केले.
कार्यक्रमात कला, क्रीडा, साहित्य आदी क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मैदानावर कलाशिक्षक महेंद्र पाटील यांची रायगड जिल्ह्यातील ज्वलंत समस्या अर्थात वाळीत प्रकरणावर प्रकाश टाकणारी रांगोळी आकर्षण ठरली. यावेळी नचिकेताज व सुविद्या इंग्रजी माध्यमाच्या बालकलाकारांनी पथनाट्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाळीत टाकण्याची प्रथा अमानवीय असे सामाजिक संदेश देत उपस्थितांची दाद मिळवली.