अवघा रंग एक झाला, रंगी रंगला..., पर्यावरणपूरक रंगोत्सवावर अनेकांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 02:05 IST2018-03-03T02:05:46+5:302018-03-03T02:05:46+5:30

गेल्या आठवड्यापासून बाजारपेठेला चढलेला विविध रंगांचा साज शुक्रवारी पहाटेपासून प्रत्येकाच्याच चेह-यावर दिसून आला. शुक्रवारी सकाळी घराघरांतून लहानग्यांचे आणि तरुण-तरुणींचे घोळके हातात रंगांच्या पिचका-या आणि रंगीत पाणी भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या सांभाळत घराबाहेर पडले

Vivid colors have become one, colorful colors ..., eco-friendly color festivities fill many | अवघा रंग एक झाला, रंगी रंगला..., पर्यावरणपूरक रंगोत्सवावर अनेकांचा भर

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला..., पर्यावरणपूरक रंगोत्सवावर अनेकांचा भर

मुंबई : गेल्या आठवड्यापासून बाजारपेठेला चढलेला विविध रंगांचा साज शुक्रवारी पहाटेपासून प्रत्येकाच्याच चेह-यावर दिसून आला. शुक्रवारी सकाळी घराघरांतून लहानग्यांचे आणि तरुण-तरुणींचे घोळके हातात रंगांच्या पिचका-या आणि रंगीत पाणी भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या सांभाळत घराबाहेर पडले. गल्लीबोळांतून लाऊडस्पीकरवर रंगोत्सवाच्या गीतांची धून वाजू लागली. मग तरुणाईची धुंद पावले संगीताच्या सुरात ताल धरू लागली. मावळतीच्या आकाशावर जेव्हा लाली पसरली तेव्हा रंगोत्सवाच्या उत्साहात न्हाऊन निघालेली तरुणाई घरोघर परतू लागली.
‘पर्यावरणस्नेही’ उत्सव साजरे करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शहर-उपनगरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू असली, तरी नैसर्गिक रंगांच्या महागड्या खेळाला गरीब मुंबईकरांची पसंती नव्हतीच. गेल्या आठवड्यापासूनच मुंबईच्या बाजारपेठांमध्ये पदपथांवर रंगांची दुकाने थाटली गेली होती. याशिवाय, सोशल मीडियावर होळी आणि रंगपंचमीचा जोरदार उत्साह दिसून आला. दोन्ही दिवस नेटीझन्सने होळीचे फोटो, रंगलेल्या चेहºयांचे डीपी आणि फेसबुक लाइव्ह ज्याचा-त्याचा शिमगा हेच अपडेट्स दिसून आले.
मुंबईच्या रंगोत्सवाला रासायनिक संकटाचे गालबोटही लागले. श्रीमंत वस्त्यांमध्ये मात्र, सुरक्षित रंगोत्सवाची बºयापैकी जाण दिसत होती. आलिशान इमारतींच्या आवारांमध्ये रंगांच्या दुनियेत रमलेल्या तरुणाईचा उत्साहदेखील ओसंडून वाहत होता. अनेक इमारतींच्या संकुलांमध्ये पाण्याचे तात्पुरते हौदही तयार करण्यात आले होते. रंगोत्सवात रंगलेली तरुणाई या रंगीत पाण्यात न्हाऊन निघत होती.
शहर-उपनगरातील झोपडपट्ट्या आणि आलिशान इमारतींमध्ये रंगोत्सवाचा उत्साह मात्र सारखाच होता. चित्रपट, नाटक आणि छोट्या पडद्यावरील कलाकारांचा रंगोत्सव हे याही वेळी मुंबईकरांचे आकर्षण असते. यंदा मात्र प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे बॉलीवूडवर शोककळा पसरल्याने हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी रंगपंचमी साजरी केली नाही. मात्र मराठी सिने-नाट्यसृष्टीतील कलाकारांनी धम्माल-मस्ती करत रंगांची उधळण केली.
>१५ जणांच्या डोळ्यांना इजा
परळ येथील केईएम रुग्णालयात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत २२ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले. त्यापैकी १५ जणांना डोळ्यांच्या तक्रारी उद्भवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. भाभा, राजावाडी व भगवती रुग्णालयामध्येही ओपीडीमध्ये पंधरा रुग्णांवर याच कारणांसाठी उपचार देण्यात आले. यापैकी रस्त्ये अपघातामध्ये जखमी झालेल्यांना शहर-उपनगरांतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींना उपचार देत घरी सोडण्यात आले.
>पर्यावरणस्नेही रंगोत्सव
नैसर्गिक रंगांचा वापर करून धुळवड साजरी करावी. पर्यावरणाचे तसेच आपल्या आरोग्याचे रक्षण करावे, असा संदेश देण्यासाठी ‘पर्यावरणस्नेही रंगोत्सव’ या उपक्रमाचे ह्युमॅनिटी फाउंडेशनतर्फे काळाचौकी येथे शुक्रवारी आयोजन करण्यात आले. या वेळी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. रसायनमिश्रित रंगांमुळे पर्यावरणाला व आरोग्याला होणाºया दुष्परिणामांची माहिती देण्यात आली.
>मालाडमध्ये पारंपरिक होळी
मालाड पूर्वेकडील कुरार गावात मोठ्या जल्लोषात होळी व धुलिवंदन साजरे करण्यात आले. विठ्ठल मंदिर, एन. एस. जी. कट्टा, गवत्या कम्पाउंड, त्रिवेणी नगर, वीर सावरकर मैदान अशा विविध भागांत होळी पेटविण्यात आली. कोकणी पाड्यात आदिवासीबहुल नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने होळी पेटविली. नवनिर्माण संघर्ष ग्रुपच्या सदस्यांनी पाण्याचा अपव्यय टाळत, नैसर्गिक होळी साजरी करण्याचे आवाहन सर्व स्थानिकांना केले. कोकणी पाड्यातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत एकमेकांवर फुलांची आणि नैसर्गिक रंगांची उधळण करीत होळीचा आनंद लुटला.
>रंगीबेरंगी पक्षी संवर्धनाचा संदेश
धुलिवंदनानिमित्त संपूर्ण मुंबईत जल्लोषाचे वातावरण आहे. सण साजरे करत असतानाच पर्यावरणाचे भान ठेवणे गरजेचे आहे. यानिमित्ताने वॉचडॉग फाउंडेशनतर्फे आरे दुग्ध कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कर्नाळा पक्षी अभयारण्यातील पक्षी संवर्धन करण्याचा सामाजिक संदेश दिला आहे.
निसर्गातील रंगीबेरंगी पक्षी पुढच्या पिढीलादेखील बघता यावेत, यासाठी त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले.
>हुक्का पॉटच्या प्रतिकृतीचे दहन
ग्रॅण्ट रोड येथील पंचशील सोसायटीमध्ये हुक्का पॉटची प्रतिकृती तयार करून त्यांचे दहन करण्यात आले. कमला मिलमध्ये हुक्क्यामुळे लागलेल्या आगीचा निषेध करण्यासाठी येथे हुक्क्याची प्रतिकृती तयार करून होळी साजरी करण्यात आली.
>होळीत जाळा अवगुणांना
प्रत्येकाला यशाचे शिखर गाठायचे आहे, पण एकमेकांचे पाय खेचून नाही, असा एक आगळावेगळा संदेश चारकोपमधील तरुणांनी दिला. मनातील वाईट विचार आणि अवगुणांना या होळीत जाळून टाकण्याचेदेखील त्यात म्हणण्यात आले होते. ही होळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. चारकोपच्या गणेश गल्लीतील सेक्टर २मध्ये ‘होळीवर एक नजारा’ येथील तरुणांमार्फ त तयार करण्यात आला. इकोफ्रेंडली रंगांचा वापर करून ‘पाणी वाचवा’ हा संदेशही त्यांनी मुंबईकरांना दिला.
>मोलकरणींना ‘पाणी वाचवा’चा संदेश!
सण साजरा करताना पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेणे हेदेखील आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही इकोफ्रेंडली धुळवड साजरी केली. मात्र त्याचसोबत सोसायटीत काम करायला येणाºया मोलकरणींना ‘पाणी वाचवा’ हा संदेश दिला. धुणीभांडी करताना बेसिनचा नळ सताड उघडा ठेवून त्या काम करतात. त्यामुळे पाण्याचा बराच अपव्यय होतो. त्यामुळे बादलीत पाणी घेऊन साफसफाई करण्याचे फायदे आणि भविष्यासाठी त्याची उपयुक्तता आम्ही त्यांना समजावून सांगितली. तसेच आम्ही स्वत: लोकांना याबाबत जाऊन सांगणार आहोत, जेणेकरून पाण्याचा एक एक थेंब वाचविण्यात आम्हाला खारीचा वाटा मिळेल. - सचिन शर्मा, विद्यार्थी, कांदिवली.
>तळीरामांंची नाकाबंदी : धुलिवंदनानिमित्त शहर आणि उपनगरात हुल्लडबाजी करणाºयांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून उपाययोजना करण्यात आली होती. प्रमुख मार्ग, चौपाटीच्या ठिकाणी नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी अपघात वा अन्य दुर्घटना टळल्या. दारु पिऊन, बेशिस्तपणे वाहन चालविणाºयांवर किती कारवाई केली, याबाबत माहितीसाठी अधिकाºयांकडे वारंवार संपर्क साधला असता त्यांच्याकडून मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: Vivid colors have become one, colorful colors ..., eco-friendly color festivities fill many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.