पोलीस तपासात विवेक ‘पोळ’ला
By Admin | Updated: August 19, 2014 23:47 IST2014-08-19T22:59:12+5:302014-08-19T23:47:13+5:30
हौतात्म्याला एक वर्ष...

पोलीस तपासात विवेक ‘पोळ’ला
मोहन मस्कर-पाटील - सातारा --महाराष्ट्र पोलिसांची तुलना ‘स्कॉटलंड यार्ड’शी केली जाते. मात्र, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास लक्षात घेता पोलीस फक्त नावालाच ‘स्कॉटलंड यार्ड’ असल्याची प्रतिक्रिया भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या सातारा जिल्ह्यातील माजी जवानांनी केली आहे. पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दाभोलकर हत्येचा तपास चुकीच्या पध्दतीने हाताळल्याचा ठपका यानिमित्ताने ठेवला आहे.
‘अंधश्रध्दा निर्मूलन समिती’चे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर समतेचा विचार करतच वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. आपल्या मागे कोण उभे आहे आणि आपल्याबरोबर कोण येणार आहे, याची तमा अथवा काळजी त्यांनी कधी केली नाही. समाजात जे-जे चांगले आहे, त्याचे समर्थन करत ते आणखी चांगले करण्यासाठी आणि त्यामध्ये सकल जनांचे भले व्हावे म्हणून आयुषय्भर प्रयत्न केले असल्याची प्रतिक्रिया लष्करातील माजी सैनिकांनी दिली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणजे एक विचार होता. चुकीच्या वाटेवरील घटकांना त्यांनी नेहमी अहिंसेच्या मार्गान रोखले परिणामी अविवेकी मार्गाने जाणाऱ्यांना ते नेहमीच शत्रू वाटले. अनेक संकटे आली तरी ते कधी मागे सरले नाहीत. भोंदूगिरी करणाऱ्यांच्या विरोधात त्यांची व्यापक मोहीम होती. यामध्ये पिचला जाणारा वर्ग वंचित होता, हे डॉक्टरांनी ओळखले होते, म्हणूनच तर त्यांनी आपली हयात त्यांच्या हितासाठीच तेवत ठेवली. त्यांचा विचार नेहमीच तेवत राहणार आहे.
निवृत्त लष्करी अधिकारी प्रतिक्रिया
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे अधंश्रध्दा विरोधातील कार्य उल्लेखनीय होते. भोंदूगिरीच्या विरोधात ते नेहमी विवेकी विचाराने कार्यरत राहिले. केवळ माणूस म्हणून नव्हेतर समाजातील प्रत्येक घटकांचा आणि खास करून वंचित समाजाच्या हितासाठी आयुष्य वेचणारे डॉक्टर आमच्यात नाहीत, ही कल्पनाच मनाला सहन होत नाही. चालशिल्लक राहतील.
- उदाजीराव निकम, सातारा
लष्करात एखाद्या अविचारी कृतीचा तपास करावयाचा असेलतर त्यासाठी एक निश्चित असा कार्यक्रम ठरलेला असतो. त्यासाठी काय करायचे, ती मोहीम फत्ते कशी करता येईल, यासाठी सैनिक जीवाचे रान करतात. मात्र, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पाहिला की, पोलीस कुठेतरी चुकत असल्यासारखे वाटतात. न्यायासाठी लढणारा माणूस आमच्यात नाही, याची खूप मोठी खंत आहे.
- मोहन जाधव, क्षेत्रमाहुली
पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास नीट पध्दतीने हाताळला नाही. ज्या मार्गावर डॉक्टरांना कधी जायचे नव्हते, त्याच मार्गावर त्यांच्या हत्येचा तपास नेऊन पोळांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीला काळीमा फासला. पोलिसांच्या या कृतीचे कधीच समर्थन करता येणार नाही. पोलीस त्यांच्या तपासात कमीच पडले. पोलिसांची कीव करावी वाटते.
-लक्ष्मण सूर्यवंशी, पुसेगाव, ता. खटाव