विवेक पाटील यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:07 IST2021-06-16T04:07:32+5:302021-06-16T04:07:32+5:30
ईडीकडून माजी आमदार विवेक पाटील यांना अटक कर्नाळा बँक कोट्यवधी घोटाळा प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई / पनवेल : ...

विवेक पाटील यांना अटक
ईडीकडून माजी आमदार विवेक पाटील यांना अटक
कर्नाळा बँक कोट्यवधी घोटाळा प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई / पनवेल : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित कर्नाळा बँकेच्या शेकडो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केली. रात्री त्यांच्या निवासस्थानी छापा टाकून ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कर्नाळा बँकेकडून बनावट कर्ज प्रकरणे व गैरव्यवहारातून गेल्या काही वर्षात सुमारे ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचे तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी दीर्घकाळ आंदोलन केले होते. अपहाराची व्याप्ती मोठी असल्याने सहकार खाते, स्थानिक तपास यंत्रणेसह ईडीकडे तक्रार करण्यात आली. पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याबाबत पुढाकार घेतला होता. त्यानंतर प्रमुख संशयित, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर ईडीकडून मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणेच्या रडारवर होते. त्यांची वाहने व मालमत्तेवर ईडीने यापूर्वी टाच आणली असून गुंतवणूक असलेली विविध बँक खाती सील केली आहेत. न्यायालयाकडून अटक टाळण्यापासून संरक्षण न दिल्याने त्यांना कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मुंबई ईडी झोन-२ चे सहायक संचालक सुनील कुमार यांनी मंगळवारी रात्री त्यांना रायगड येथील निवासस्थानातून ताब्यात घेतले. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले आहे. ५० हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांच्या कर्नाळा बँकेत ठेवी आहेत. यामध्ये पनवेल, उरणमधील स्थानिकांच्या ठेवी मोठ्या प्रमाणात आहेत. महाविकास आघाडी सरकार विवेक पाटील यांना कारवाईपासून वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार महेश बालदी हे विवेक पाटील यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्नशील होते. दोन्ही आमदारांनी ठेवीदारांना घेऊन मोर्चेदेखील काढले होते.