Join us  

आठ महिन्यांत ५० हजार प्रवाशांचा व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:04 AM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पारदर्शक व्हिस्टाडोम कोचमधून चोहोबाजूंचा निसर्ग न्याहाळण्याची संधी मिळत असल्याने या कोचला प्रवाशांची पसंती मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांत तब्बल ५० हजार प्रवाशांनी व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास केला.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोमला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

ऑक्टोबर २०२१ ते २३ मे २०२२ या कालावधीत व्हिस्टाडोमने ४९,८९६ प्रवाशांनी प्रवास  केला असून ६.४४ कोटींचा महसूल मिळाला.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस १०० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच १८,६९३ प्रवासी वाहतुकीतून  ३.७० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीनने अप दिशेने म्हणजे पुणे ते मुंबई प्रवासात १.६३ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. डेक्कन एक्सप्रेसमधून १६,४५३ प्रवासी वाहतुकीतून १.११ कोटी महसूल प्राप्त झाला आहे. 

२०१८ मध्ये पहिल्यांदा सुरुवातमुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये २०१८ मध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा जोडला होता. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे २६ जून २०२१ पासून मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसला जोडण्यात आले.  प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई-पुणे मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच  १५ ऑगस्ट २०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला.

या आहेत सुविधाव्हिस्टाडोम डब्यांमध्ये पारदर्शक खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, मल्टिपल टेलेव्हिजन स्क्रीन, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स यांसारखी वैशिष्ट्ये आहे.

 

टॅग्स :रेल्वेमुंबई