विमानतळबाधितांची मगरपट्टा शहराला भेट
By Admin | Updated: April 27, 2015 04:31 IST2015-04-27T04:31:59+5:302015-04-27T04:31:59+5:30
पुण्याजवळील मगरपट्टा शहराच्या धर्तीवर पुष्पकनगरचा विकास करण्याची सिडकोची योजना आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी

विमानतळबाधितांची मगरपट्टा शहराला भेट
नवी मुंबई : पुण्याजवळील मगरपट्टा शहराच्या धर्तीवर पुष्पकनगरचा विकास करण्याची सिडकोची योजना आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी न विकता मगरपट्टा शहराचा आदर्श घेऊन आपल्या भूखंडाचे सोने करावे, या दृष्टीने सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिडकोने विमानतळबाधितांसमवेत शुक्रवारी मगरपट्टा शहराला भेट दिली. यावेळी प्रकल्पग्रस्तांसाठी एक सादरीकरण व शंका-निरसनासाठी प्रश्नोत्तराचे सत्र ठेवण्यात आले होते. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा आणि मगरपट्टा शहराचे व्यवस्थापक सतीश मगर यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले.
पुण्यातील मगरपट्टा सिटी म्हणजे एका शहरात वसलेले शहर, जे अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त आहे. हे शहर कोणत्याही बांधकाम व्यावसायिक किंवा सरकारने घडवले नसून हडपसर येथे शेकडो वर्षे राहत असलेल्या १२३ मगर कुटुंबीयांनी एकत्र येऊन ४०० एकर जमिनीवर घडवले आहे. प्रत्येकाच्या मालकीची जमीन विकून प्रत्येक कुटुंबाने एकहाती पैसे घेण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन जर जमिनीचा विकास केला व एक शहर वसवले तर त्याची भविष्यात चांगली फळे मिळतील, या दूरदृष्टीतून मगर बांधवांनी एकत्र येऊन या शहराची स्थापना केली. मगरपट्टामुळे ७० हजार नागरिकांना रोजगार मिळाला आहे. जमिनी विकून पैसा मिळल्यानंतर हे शक्य झाले नसते.
विमानतळ प्रकल्पग्रस्तांनासुद्धा देण्यात येत आलेल्या २२.५ टक्के भूखंडाची विक्री करून एकहाती पैसा मिळवण्यापेक्षा प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे शहर विकसित करावे, अशी सिडकोची संकल्पना आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया व सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांचे सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)