विद्यापीठ तयार करणार व्हीजन डॉक्युमेंट
By Admin | Updated: December 31, 2014 23:09 IST2014-12-31T23:09:22+5:302014-12-31T23:09:22+5:30
देशात पुढील दहा वर्षांमध्ये कोणत्या क्षेत्रातील मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.
विद्यापीठ तयार करणार व्हीजन डॉक्युमेंट
राहूल शिंदे - पुणे
देशात पुढील दहा वर्षांमध्ये कोणत्या क्षेत्रातील मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. तसेच त्यादृष्टीने कोणते अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान देणे गरजेचे आहे, याचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक व संशोधनदृष्ट्या ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षण व विविध क्षेत्रांतील राष्ट्रीयस्तरावरील तज्ज्ञ अभ्यासकांचे सहकार्य घेतले जाणार आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्वत:चे व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातर्फे संशोधनाला प्राधान्य देण्यासाठी लवकरच नवीन योजना सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना पारंपरिक ज्ञानाबरोबरच विविध कौशल्येही आत्मसात व्हावेत, या दृष्टीने पाऊल उचलले जाणार आहे.
डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, की राष्ट्रीय स्थरावरील तज्ज्ञ व्यक्तींच्या सहकार्याने विद्यापीठाचे व्हीजन डॉक्युमेंट तयार केले जाणार आहे. त्यानुसार विद्यापीठाची संशोधनाची व शैक्षणिक दिशा निश्चित केली जाईल. केवळ विज्ञानच नाही तर इतर सर्व विद्याशाखांनी पुढील काळात कोणत्या क्षेत्रात संशोधन करावे याबाबतचा निर्णय व्हीजन डॉक्युमेंटच्या आधारे घेतला जाणार आहे. विद्यापीठातर्फे पीएच.डी. करणाऱ्या १०० गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना यूजीसीप्रमाणे शिष्यवृत्ती देण्याची योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे.तसेच देशात कोणत्या उद्योगक्षेत्रांचा विकास होणार आहे. याचा विचार करून विद्यार्थ्यांना त्यासंदर्भातील कौशल्य देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
२00 महाविद्यालयांमध्ये व्हर्च्युअल क्लास रुम्स्
विद्यापीठातर्फे व्हर्च्युअल क्लास रूम तयार करण्याचे काम पुढील काही महिन्यांत सुरू केली जाईल, असे नमूद करून गाडे म्हणाले, की प्रथमत: विद्यापीठाशी संलग्न २00 महाविद्यालयांमध्ये व्हर्च्युअल क्लास रुम्स् उभ्या केल्या जातील.एका क्लासरूमसाठी सुमारे ४ लाख रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करावी लागेल. त्यातील अर्धी रक्कम विद्यापीठातर्फे दिली जाणार असून, उर्वरित रक्कम महाविद्यलयाला खर्च करावी लागणार आहे.
विद्यापीठात स्थापन केल्या जाणाऱ्या अत्याधुनिक व्हर्च्युअल क्लास रुमसाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे.