घर खरेदी-विक्रीसाठी व्हर्च्युअल प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:19 IST2020-12-04T04:19:02+5:302020-12-04T04:19:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना संक्रमणामुळे घरांच्या खरेदी-विक्रीसाठी सालाबादप्रमाणे प्रदर्शन भरविणे अशक्य असल्याने क्रोडाई आणि एमसीएचआयने व्हर्च्युअल प्रदर्शन ...

घर खरेदी-विक्रीसाठी व्हर्च्युअल प्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संक्रमणामुळे घरांच्या खरेदी-विक्रीसाठी सालाबादप्रमाणे प्रदर्शन भरविणे अशक्य असल्याने क्रोडाई आणि एमसीएचआयने व्हर्च्युअल प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे. ४ डिसेंबर २०२० ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून विश्वासार्ह विकासक आणि गृहखरेदीदार यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील १००हून अधिक विकासक आणि सुमारे ५ लाख गृहखरेदीदार सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, गुगल आणि बुक माय शो यांचाही या प्रदर्शनात सहभाग असेल.
एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक गोराडिया यांनी एका पत्रकार परिषदेत या प्रदर्शनाची माहिती दिली. या प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या गृहखरेदीदारांना आपल्या आवडीच्या प्रकल्पाची थ्री डी व्हर्च्युअल टूर करण्याची संधी व ॲक्सेस मिळणार आहे, व्याजदर व प्रक्रिया शुल्कात एसबीआयतर्फे सवलत मिळणार आहे. त्याचप्रमाणे लाइव्ह चॅट आणि व्हिडीयो कॉन्फरन्सिंग, २४ बाय ७ सपोर्ट, सर्व प्रोजेक्ट मटेरिअल्ससाठी हेल्पडेस्कच्या पर्यायांचा लाभ घेऊ शकता आणि या विषयातील तज्ज्ञांचे विचार ऐकू शकता. अनेक मोठे व प्रतिष्ठित विकासक त्यांच्या विद्यमान व नवीन प्रकल्पांवर फ्लॅश डिस्काउंट्सही उपलब्ध करून देतील, असे त्यांनी सांगितले. गृहखरेदीदारांना वाजवी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देत आणि गृहकर्ज प्रक्रिया जलद गतीने करत विकासक आणि गृहखरेदीदार यांच्यातील व्यवहार सुकर करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे स्टेंट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई मेट्रो सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक प्रवीण राघवेंद्र यांनी यावेळी सांगितले.