विरारची बत्ती १२ तास गुल
By Admin | Updated: May 7, 2015 00:18 IST2015-05-07T00:18:55+5:302015-05-07T00:18:55+5:30
वसई-विरार उपप्रदेशात मंगळवारी रात्री १२ तास वीज गुल होती. उकाड्यामध्ये रात्र काढताना नागरिकांचा संयम तुटला.

विरारची बत्ती १२ तास गुल
वसई : वसई-विरार उपप्रदेशात मंगळवारी रात्री १२ तास वीज गुल होती. उकाड्यामध्ये रात्र काढताना नागरिकांचा संयम तुटला. अनेकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तर मिळाले नसल्याने संताप अधिकच वाढला. पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, हॉटेल व्यावसायिकांवर याचा परिणाम झाला. महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे भविष्यात आंदोलनाची तयारी सुरु झाली आहे.
रात्री ९.३० वाजता उपप्रदेशातील वीज खंडित झाली. आता येईल, थोड्या वेळाने येईल, असे करीत नागरिक वाट बघत होते. मात्र रात्रभर वीजेचा पत्ताच नव्हता. सध्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यातच वीज नसल्याने मोठी फजिती झाली. अनेकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर खापर फोडत कशीबशी रात्र काढली. मात्र रुग्ण, बालक, वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. (प्रतिनिधी)
गोंधळ वाढला
> काही नागरिकांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली. मात्र अधिकारी, कर्मचारी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. काहींनी फोनवरून संपर्क केला मात्र ‘नॉट रीचेबल’मुळे गोंधळ अधिकच वाढला.
> अनियमित वीजपुरवठा होत असताच कंपनीने चालू महिन्यामध्ये सुरक्षा अनामत रकमेची अतिरिक्त देयके ग्राहकांना पाठविली आहे. प्रथम सेवा सुरळीत द्या, नंतरच अतिरिक्त देयक पाठवा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
> देयके वेळेवर : नियमित वीजपुरवठा खंडित होत असला तरी, वीज देयके मात्र वेळेवर देण्यास कंपनी विसरत नाही. विशेष म्हणजे, एखाद्या ग्राहकांने बिल भरण्यास विलंब केल्यास त्या ग्राहकांचा पुरवठा त्वरित खंडित केल्या जातो.
मोबाईल नॉट रिचेबल
> वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर ग्राहकांनी अधिकाऱ्यांनी याबाबत विचरण्याचा प्रयत्न केला. मात्र बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले मोबाईल बंद ठेवले. तर काहींनी उत्तर देणे टाळले. विशेष म्हणजे, काही ग्राहकांनी मोबाईलचा टॉर्च म्हणून वापर केला. मात्र तोही जास्त वेळ टिकला नाही.
अनेकांची धावपळ
> रात्रभर वीजपुरवठा खंडीत असल्याने आरोग्यसेवेवर याचा परिणाम जाणवला. बहुतांश रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल झाले. विशेष म्हणजे, काही औषधांना फ्रिजमध्ये ठेवावे लागते. मात्र वीज नसल्याने औषध दुकानदारांची चांगलीच दमछाक झाली. तर काहींनी धावपळ करून जनरेटरची सोय केली.
पाणी पुरठ्यावर परिणाम
> तब्बल १२ तास खंडीत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे पाणी तसेच इसर सेवांवर याचा परिणाम जाणवला. अनेकांना टाकीमध्ये पाणी चढविणे कठिण झाले. तर काही परिसरात पाणी सुद्धा आले नाही.