Join us

नव्या व्हेरिएंटपेक्षा व्हॉट्सॲपवरील व्हायरल भीतिदायक; डॉ. गंगाखेडकर यांनी व्यक्त केली खंत

By संतोष आंधळे | Updated: December 28, 2023 05:56 IST

अशास्त्रीय घातक सल्ल्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. जेएन. १ हा नवीन व्हेरिएंट या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. हा व्हेरिएंट सौम्य प्रकारचा आहे. घाबरण्याची गरज नाही, मात्र यापेक्षा अधिक भीतीदायक वातावरण सोशल मीडियावरील अफवांमुळे निर्माण झाले आहे, अशी खंत राज्य कोरोना कृती दलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. त्याचबरोबर अशास्त्रीय घातक सल्ल्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 

सद्य:स्थितीत राज्यात कोरोनाचे २६५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यासोबत जेएन. १ या नवीन व्हेरिएंटचे १० रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यातील सर्व आरोग्य विभागांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्यातील कोरोना बाधेची कारणमीमांसा, विश्लेषण करून त्यावर उपाय सुचविण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य विभागाने मंगळवारी नवीन कोरोना टास्क फोर्सची स्थापना केली आहे. नवीन व्हेरिएंटची वेगळी अशी लक्षणे नाहीत. सर्दी, खोकला, ताप ही सर्वसामान्यच लक्षणे आहेत. 

हा जुन्या ओमायक्रॉनचा उपप्रकार आहे. याची लागण झाली तरी घाबरायची गरज नाही. कारण आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही, आपल्याला उपचारपद्धती माहिती आहेत, आरोग्याशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणा सज्ज आहेत, अशी माहिती डॉ. गंगाखेडकर यांनी दिली. दोन-तीन दिवसांत नवीन सदस्यांची बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘अफवा पसरवू नका’

नवीन व्हेरिएंटने डोके वर काढताच सोशल मीडियावर घातक सल्ल्यांना उधाण आले असून कोरोनाचा आजार बरा करण्याचे उपाय सुचविले जात आहेत. नागरिकांनी सतर्क राहून ही चुकीची माहिती पुढे फॉर्वर्ड करू नये. पूर्वी आपल्याला या आजाराबद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र आता मोठ्या प्रमाणात लसीकरण, संशोधन झाले आहे. त्यामुळे वायरल होणारी चुकीची माहिती पसरवू नका, भीतिदायक वातावरण टाळा, अंगावर आजार न काढता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन डॉ. गंगाखेडकर यांनी केले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस