निकालाची डेडलाइन देण्यास विनोद तावडे यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 06:00 IST2017-08-19T06:00:46+5:302017-08-19T06:00:48+5:30

मुंबई विद्यापीठाच्या रेंगाळलेल्या निकालासमोर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे हतबल झाल्याचे चित्र आहे.

Vinod Tawde's denial of extradition deadline | निकालाची डेडलाइन देण्यास विनोद तावडे यांचा नकार

निकालाची डेडलाइन देण्यास विनोद तावडे यांचा नकार

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या रेंगाळलेल्या निकालासमोर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे हतबल झाल्याचे चित्र आहे. विद्यापीठाचे सर्व निकाल कधीपर्यंत घोषित होतील, त्यासाठी डेडलाइन काय असेल, याचे उत्तर देण्यास तावडे यांनी शुक्रवारी स्पष्ट नकार दिला.
मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत तावडे म्हणाले की, लवकरात लवकर सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील. मात्र, त्यासाठी कोणतीही डेडलाइन देण्यात आलेली नाही. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी पर्यायी व्यवस्था सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी वेगळी रचना तयार करण्यात येईल. पुनर्मूल्यांकनाचे शुल्क सध्या ५० टक्के कमी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागतील, याला प्राधान्य देण्यात येईल, असे तावडे यांनी सांगितले.
पदवी परीक्षेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रवेश थांबविला जाणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याचा निकाल उशिरा लागला, पण तो विद्यार्थी जर मेरिटमध्ये असेल, तर त्याला प्रवेश दिला जाईल. ज्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत, तेवढेच निकाल जाहीर करता येतील का, याबाबत परीक्षा मंडळाला सुचविण्यात येईल. बहुतांश परीक्षांचे ९६ टक्के मूल्यांकन पूर्ण झाले असून, ४ टक्के मूल्यांकन शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांनी आज राज्यपालांकडे सादरीकरण केले. निकालाची सद्यस्थितीची माहिती त्यांनी राज्यपालांना दिली. उत्तरपत्रिका तपासण्याबाबत उद्भवलेल्या अडचणींचे कोणत्या पद्धतीने निराकारण करण्यात आले, याची माहितीही राज्यपालांना देण्यात आली असून, कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे तावडे यांनी सांगितले.
>वेतनाबाबत सोशल मीडियातून चुकीची माहिती
शिक्षकांचे वेतन कोणत्या बँकेतून होणार या संदर्भात काही शिक्षक संघटना चुकीची माहिती पसरवत आहेत. शिक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकूण ९५६ शाळांपैकी ७१४ शाळांच्या मुख्याध्यापकांनी मुंबई बँकेमध्ये खाते उघडले आहे. उर्वरित २०४ मुख्याध्यापकांना मुंबई अथवा युनियन बँक असा पर्याय या संदर्भात, उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत देण्यात आलेला आहे. एकूण २१ हजार ७८० शिक्षकांपैकी १९ हजार ६६९ शिक्षकांनी मुंबई बँकेत खाते उघडले आहे. आतापर्यंत ११ हजार ६६५ शिक्षकांना वेतन अदा करण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.

Web Title: Vinod Tawde's denial of extradition deadline