अवैध पाणीउपशाविरोधात ग्रामस्थ उतरले रस्त्यावर
By Admin | Updated: December 16, 2014 22:51 IST2014-12-16T22:51:15+5:302014-12-16T22:51:15+5:30
वसई-विरारच्या ग्रामीण भागातील भूगर्भातील प्रचंड पाणीउपशामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अवैध पाणीउपशाविरोधात ग्रामस्थ उतरले रस्त्यावर
वसई : वसई-विरारच्या ग्रामीण भागातील भूगर्भातील प्रचंड पाणीउपशामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी या प्रश्नावरून मर्देस - वंडा गाव येथे गावकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी ग्रामस्थांनी काही काळ रास्तारोकोही केला.
ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाणीउपसा होत असल्याबाबत स्थानिकांनी वेळोवेळी महसूल प्रशासनाकडे तक्रारीही केल्या. गेल्यावर्षी तत्कालीन आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागात यासंदर्भात सभा आयोजित केली होती. यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पाणीउपसा त्वरीत बंद करू असे आश्वासन दिले होते. परंतु त्यासंदर्भात कार्यवाही न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष खदखदत होता. मर्देस-वंडागाव येथे टँकरवाल्यांनी पुन्हा पाणीउपसा सुरू केल्यामुळे संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले व त्यांनी रास्तारोको केला. स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाणीउपसा करणाऱ्या टँकरचालकाला टँकरमधील पाणी पुन्हा तलावात सोडण्यास सांगितले. ते तलावात सोडल्यानंतर जमाव शांत झाला व आंदोलन थांबले. पाणीउपसा करण्यास बंदी असतानाही टँकरचालक महसूल विभागाशी हातमिळवणी करून अशा प्रकारचा पाणीउपसा करीत असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.