पनवेलमध्ये ‘भाकरीचे गाव’
By Admin | Updated: May 6, 2015 00:56 IST2015-05-06T00:56:26+5:302015-05-06T00:56:26+5:30
‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’ किंवा ‘आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर!’ या ओळींचा संदर्भ वेगळा असला तरी यातील भाकरी पनवेलच्या तक्का गावाची वेगळी ओळख बनली आहे.

पनवेलमध्ये ‘भाकरीचे गाव’
पनवेल : ‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’ किंवा ‘आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर!’ या ओळींचा संदर्भ वेगळा असला तरी यातील भाकरी पनवेलच्या तक्का गावाची वेगळी ओळख बनली आहे. भाकरी बनवून गावातील प्रत्येक महिला सक्षम बनली आहे. तिने कुटुंबालाही आधार दिला आहे. या गावातील भाकऱ्या परिसरातील सर्व हॉटेलांत खवय्यांना तृप्त करत आहेत.
शाकाहार असो वा मांसाहार तांदळाची भाकरी जेवणाची लज्जत वाढवते. पण तक्का गावातील महिलांनी भाकरी कुटुंबापुरतीच मर्यादित न ठेवता तालुक्यातील तारांकित हॉटेल, ढाब्यांपर्यंत पोहोचवली. इथल्या प्रत्येक हॉटेल, ढाब्यातील भाकरी तक्का गावातीलच असल्याचे या महिला अभिमानाने सांगतात. ओम साई महिला मंडळाने गावातील महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. मंडळात ४० महिला आहेत. त्या सकाळी व संध्याकाळी आॅर्डरनुसार भाकऱ्या बनवतात. तांदळाच्या पिठाची उकड काढून, पाण्यावर थापून भाकरी बनवली जाते. एक महिला रोज जवळपास ५० भाकऱ्या बनवते. रोजची आॅर्डर ही महिला मंडळामध्ये समसमान वाटून घेतली जाते, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष सुनंदा वाघिलकर यांनी दिली. दीड ते पाच हजारांपर्यंत आॅर्डर घेतली जाते. यातून एक महिला महिन्याला १० हजार रुपये कमवते. दरमहा १०० रुपये सामाजिक कार्यासाठी जमा करते. या पैशांतून मंदिर व शाळांना नऊ इन्व्हर्टर देण्यात आले आहेत. (वार्ताहर)