विक्रमादित्यचे अपेक्षित विजेतेपद
By Admin | Updated: November 24, 2015 02:19 IST2015-11-24T02:19:48+5:302015-11-24T02:19:48+5:30
संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने अपेक्षित कामगिरी करताना अखिल महाराष्ट्र फिडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेत सहजपणे विजेतेपद पटकावले

विक्रमादित्यचे अपेक्षित विजेतेपद
मुंबई : संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने अपेक्षित कामगिरी करताना अखिल महाराष्ट्र फिडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेत सहजपणे विजेतेपद पटकावले. यासह त्याने बीएम झवेरी स्मृती चषकावर कब्जा करताना रोख रक्कम २५ हजारांचे बक्षिसही मिळवले. तसेच स्पर्धेत अपराजित राहिलेला अन्य खेळाडू चिराग साटकरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बोरीवली येथील डॉन बॉस्को स्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेत सुरुवातीपासूनच विक्रमादित्यने दबदबा राखला होता. एकूण १० फेऱ्यांच्या या स्पर्धेत त्याने सर्वाधिक ९ गुणांसह बाजी मारली. तर चिरागने ८.५ गुणांसह द्वितीय स्थानी झेप घेतली. अंतिम फेरीमध्ये विक्रमादित्यने स्पर्धेत चमकदार आगेकूच करणाऱ्या वेदांत पानेसरला सहजपणे नमवले. सावाध सुरुवात करुन वेदांतच्या चालींचा अंदाज घेतल्यानंतर विक्रमादित्यने आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी दबावाखाली आलेल्या वेदांतकडून चुका झाल्या आणि त्या जोरावर विक्रमादित्यने विजेतेपद निश्चित केले.
त्याचवेळी मुंबईच्या केतन बोरीचा याने अंतिम फेरीत राजेश गुप्ताचा पाडाव करुन ८.५ गुणांची कमाई करुन चिरागला कडवी टक्कर दिली. मात्र टाय-ब्रेकमध्ये पिछाडीवर पडल्याने केतनला तृतीय स्थानी समाधान मानावे लागले. तसेच अमरदीप बारटक्के आणि फिडे मास्टर अविनाश आवटे यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान पटकावले.