विजय क्लबचे शानदार विजेतेपद

By Admin | Updated: February 8, 2015 00:34 IST2015-02-08T00:34:23+5:302015-02-08T00:34:23+5:30

दादरच्या बलाढ्य विजय क्लबने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना जयदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा - राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले.

Vijay Club's glorious title | विजय क्लबचे शानदार विजेतेपद

विजय क्लबचे शानदार विजेतेपद

मुंबई : दादरच्या बलाढ्य विजय क्लबने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना जयदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा - राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात सावध खेळ करताना विजय क्लबने एच. जी. एस. संघाचा १७-८ असा पाडाव केला.
राजाभाऊ साळवी उद्यानातील किरण मुनगणकर क्रीडांगणावर पार पडलेल्या या सामन्यातील पहिल्याच चढाईमध्ये प्रमोद पवारने विजय संघाच्या प्रीतम लाडची जबरदस्त पकड करताना एच.जी.एस.च्या गुणांचे खाते उघडले. यानंतर मात्र विजय क्लबने दमदार पुनरागमन करताना एच.एजी.एस.ला दडपणाखाली ठेवले. अजिंक्य कापरेने एकाच चढाईत २ गडी टिपताना विजय क्लबला आघाडीवर नेले. त्याचवेळी दुखापत झाल्याने अजिंक्यला बाहेर बसावे लागले. मात्र श्री भारतीने अजिंक्यची कमतरता भरून काढताना एकूण १२ चढायांमध्ये ४ गुण मिळवत २ यशस्वी पकडी केल्या. यामुळे फॉर्ममध्ये आलेल्या विजय संघाने मध्यांतराला ११-३ अशी मोठी आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले.
दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघांनी बचावात्मक पवित्रा घेतला. त्याचवेळी पूर्णपणे दडपणाखाली आलेल्या एच.जी.एस. संघाचे नियंत्रण सुटू लागल्याने विजय क्लबने मिळालेल्या संधीचा फायदा उचलताना अखेर एकतर्फी बाजी मारत दिमाखात विजेतेपद उंचावले. सिद्धेश पायनाईक आणि प्रीतम लाड यांनी भक्कम संरक्षण करताना एचजीएसचे कडवे आव्हान सहजरीत्या परतावले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला पराभूत संघाकडून चंदन सिंगने एकाकी झुंज दिली. त्याने एकूण १२ चढायांमध्ये ४ गुण मिळवले तसेच त्याची दोन वेळा पकड झाली. शिवाय संपूर्ण स्पर्धेत चमकदार खेळ करणारा ओम्कार जाधव अंतिम सामन्यात अपयशी ठरल्याने एच.जी.एस.ला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Vijay Club's glorious title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.