Kunal Kamra Row: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टीका केल्यानंतर स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा राजकीय वादात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुणाल कामरा याने 'ठाणे कि रिक्षा' असे विडंबन गाणे तयार केलं होतं. या प्रकरणात कुणाल कामराविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर आता कुणाल कामरासोबत या शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्याही अडचणी वाढल्या आहेत. मुंबई पोलीस आता प्रेक्षकांचे जबाब नोंदवणार आहेत.
स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने खारमधील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील ‘द हॅबिटॅट’ क्लबमध्ये स्टॅण्ड अप कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर कुणाल कामराविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामराला मद्रास न्यायालयाने अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे. समन्स बजावल्यानंतरही कुणाल कामरा अद्यापही पोलिसांसमोर हजर झाला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी या शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांनी शोमधील प्रेक्षकांचे जबाब नोंदवून घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १७९ अंतर्गत प्रेक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत.
दुसरीकडे, कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दोनदा समन्स बजावले होते. त्या नंतरही कामरा पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाला नाही. त्यामुळे सोमवारी खार पोलीस मुंबईतील येथील कुणाल कामरा याच्या घरी दाखल झाले होते. यावेळी तिथे त्याचे आई वडील उपस्थित असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी कुणाल कामराच्या आई वडिलांकडे त्याच्या बाबत प्राथमिक चौकशी केली.
यानंतर कुणाल कामराने इन्स्टाग्राम पोस्टमधून मुंबई पोलिसांवर भाष्य केलं. “अशा पत्त्यावर जाणे जिथे मी गेल्या १० वर्षांपासून राहत नाही तो तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे,” अशा कॅप्शनसह कुणाल कामराने त्याचा तामिळनाडूतील घरामधील एक फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, कुणाल कामराबाबत शिवसेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी इशारा दिला आहे. शिवसेनेने मुंबई पोलिसांना पत्र लिहून कामराविरुद्ध फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट अंतर्गत चौकशीची मागणी केली आहे. कुणाल कामरा मुंबईत आल्यावर शिवसेना स्टाईलमध्ये त्यांचे स्वागत केले जाईल, असं राहुल कनाल यांनी म्हटलं.