Join us  

Vidhan sabha 2019 : आदित्य ठाकरे यांच्या चर्चेने शिवसैनिक चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 6:49 AM

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी येथून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने मुंबईतील शिवसैनिक चार्ज झाल्याचे चित्र आहे.

मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी येथून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने मुंबईतील शिवसैनिक चार्ज झाल्याचे चित्र आहे. सोमवारी आदित्य यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा चालू आहे. त्यासाठी शिवडी, वरळी अशा मतदारसंघांची नावेही चर्चेत आली. पण राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर मात्र आदित्य ठाकरे वरळीतूनच लढविणार हे जवळपास नक्की झाले. आदित्य यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने मुंबईतील शिवसैनिक विशेषत: युवासेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी चांगलेच अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. केवळ वरळीच नव्हे तर भोवतालच्या भायखळा, शिवडी, माहीम अशा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळाव्यांना वेग आला. स्वत: आदित्य यांनी यातील काही मेळाव्यांना संबोधित केले.युवासेनेने ‘हीच ती वेळ आहे, नवा महाराष्ट्र घडविण्याची’ अशी बॅनरबाजी आणि सोशल मीडियात मोहीमही चालवली. काही दिवसांपूर्वी सचिन अहिर यांच्यासह सहकाऱ्यांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अहिर यांनी आदित्य यांना उमेदवारीची घोषणा करण्याचे आवाहन केले. ‘चर्चा तर सुरूच आहे, आज पेपर फोडा. तुम्ही फक्त अर्ज दाखल करा आणि महाराष्ट्रातील प्रचारासाठी जा. वरळीतील विजयाचे प्रमाणपत्र आम्हीच मातोश्रीवर घेऊन येऊ,’ अशी कोटी अहिर यांनी केली होती. यावर, ‘पेपर तपासणीचे काम सुरू आहे. याबाबतचा निकाल स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच जाहीर करतील,’ असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. परंतु यानिमित्ताने वरळीकरांना एक आश्वासन मात्र देतो की, पाच वर्षांत असे काम करू की इथला विकास पाहायला जगातले नेते येतील, असे विधान करत वरळी नक्की झाल्याचे संकेतही त्यांनी दिले होते.उमेदवारीमुळे इतर जागांवर होणार फायदा?वरळीतील आदित्य यांच्या उमेदवारीचा थेट परिणाम आजूबाजूच्या मतदारसंघांसह मुंबईतील शिवसेनेच्या जागांवर होण्याची शक्यता आहे. विशेषत: मनसेमुळे मुंबईतील शिवसेनेच्या जागांवर परिणाम होत असल्याचे चित्र मागील दोन विधानसभा निवडणुकांत पाहायला मिळाले.२००९ च्या निवडणुकीत तर शिवसेनेला माहीम, शिवडीसारखा बालेकिल्ला गमवावा लागला होता. तर अनेक ठिकाणी मनसे उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे युतीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. २०१४ साली मोदी लाटेमुळे मनसे फॅक्टर फारसा चालला नाही.मात्र, शिवसेनेच्या परंपरागत मतदारसंघातील मनसेचा वावर म्हणजे टांगती तलवारच मानली जायची. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. एकीकडे मनसेतील संभ्रमावस्था आणि दुसरीकडे आदित्य यांची उमेदवारी यामुळे शिवसेनेला किमान मुंबईत तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019