Join us  

Video: मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; फडणवीसांनी 'या' मंदिरात केली साफ-सफाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 3:49 PM

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उदघाटन आणि प्राणप्रतिष्ठेकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरातील मंदिरात स्वच्छता मोहिम सुरू आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात महाराष्ट्र दौरा केला. मुंबईतील अटल सेतू या देशातील सर्वात लांब सागरी मार्गाचे लोकार्पण मोदींच्याहस्ते झाले. तत्पूर्वी नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन मोदींनी सेवा केली. येथील मंदिर स्वत:च्या हाताने स्वच्छ करुन मोदींनी देशभरातील नागरिकांना आपल्या गावातील मंदिर व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार, भाजपा नेत्यांकडून स्थानिक मंदिरात जाऊन स्वच्छता केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील मंदिरात जाऊन मंदिर स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. 

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उदघाटन आणि प्राणप्रतिष्ठेकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियानाअंतर्गत आज मुंबईची आराध्य देवी आई मुंबादेवी मंदिर येथे दर्शन घेऊन परिसराची साफसफाई केली, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. आपल्या श्रद्धा आणि पुजास्थळांची स्वच्छता मनाला प्रसन्नतेसोबतच एक आध्यात्मिक अनुभूती देते. प्रभू श्री रामाच्या अयोध्येतील आगमनामुळे एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. याच अनुषंगाने पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या या अभियानात सहभागी होऊन या नव्या युगाचे स्वागत स्वच्छतेच्या माध्यमातून होणाऱ्या आध्यात्मिक चेतनेच्या अनुभूतीतून करावे,असे आवाहनही यावेळी फडणवीसांनी केले आहे   आपण कोणत्याही धर्माचे, पंथाचे वा संप्रदायचे असाल तरी देखील आपल्या संबंधित पुजास्थळी जाऊन स्वच्छतेची ही अनुभूती आपण सर्वांनीच घ्यावी. या निमित्ताने, मकर संक्रांत ते अयोध्येत प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत म्हणजेच २२ जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही फडणवीसांनी सर्वधर्मीयांना केलं आहे. 

शिवसेनेवर निशाणा, राऊतांना टोला

''ज्यांचा राम मंदिर आंदोलनात कसलंही योगदान नाही, अशाप्रकारचे लोकं असे आरोप करुन स्वत:चं हसू करुन घेत आहेत. तसेच, कोट्यवधी हिंदूचा अपमान करत आहेत. आता तरी उबाठा सेनेनं अशाप्रकारे हिंदूचा अपमान करणं बंद करावं,'' असे प्रत्त्युतर देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आम्हाला उबाठा असं म्हणू नका, असे म्हटले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हणा, मी उभा ठाकलेला आहे, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत उबाठा म्हणत त्यांना डिवचंल होतं. आता, फडणवीसांनी उबाठा सेना म्हणत पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं आहे. 

टॅग्स :राम मंदिरअयोध्यादेवेंद्र फडणवीसमुंबादेवी