Join us
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे यांना मारहाण झाल्याचे व्हिडीओ सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 02:12 IST

अश्विनी बिद्रे यांची १० वर्षांची मुलगी सूची गोरे हिच्या कस्टडीबद्दल मागील सुनावणीदरम्यान विचारणा करण्यात आली होती

पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्यासमोर पार पडली. सुनावणीदरम्यान अश्विनी बिद्रे यांना मारहाण झालेले व्हिडीओ, आॅडिओ तसेच लॅपटॉप दाखवून संबंधित पुरावे खरे आहेत की नाही? याबाबत न्यायालयाने अश्विनी यांचे भाऊ आनंद बिद्रे यांच्याकडे खात्री केली.

न्यायालयाने पोलिसांनी दाखविलेले पुरावे आनंद यांना दाखविले. तसेच या पुराव्यांमध्ये छेडछाड करण्यात आली आहे का? यासंदर्भात खात्री करण्यास सांगितले. आनंद कुमार यांनी सर्व पुरावे खरे असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. सुनावणीदरम्यान मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, महेश फळणीकर तसेच राजेश पाटील यांनादेखील न्यायालयात हजर करण्यात आले होते. अश्विनी बिद्रे प्रकरणात तपासाला गती मिळण्याच्या दृष्टीने अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे व भाऊ आनंद बिद्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतील कागदपत्रेही सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर सादर करण्यात आली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत, अ‍ॅड. संतोष पवार आदींच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. आरोपींची ओळखपरेड तसेच जप्त मुद्देमालाची सत्यता पडताळणी या वेळी पार पडली. या खटल्याची पुढील सुनावणी ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

अश्विनी बिद्रे यांची १० वर्षांची मुलगी सूची गोरे हिच्या कस्टडीबद्दल मागील सुनावणीदरम्यान विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे सूचीलाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सहायक पोलीस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो आणि संदीप वाघमोडे तसेच अजय कदम हेदेखील उपस्थित होते.

टॅग्स :गुन्हेगारी