VIDEO- प्रबोधनासाठी नवयानचा विद्रोही महाजलसा
By Admin | Updated: March 27, 2017 21:28 IST2017-03-27T21:13:23+5:302017-03-27T21:28:26+5:30
ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 27 - नक्षलवादाच्या आरोपानंतर अंतरिम जामिनावर सुटलेल्या कबीर कला मंचचा विद्रोही कवी सचिन माळी आणि ...

VIDEO- प्रबोधनासाठी नवयानचा विद्रोही महाजलसा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - नक्षलवादाच्या आरोपानंतर अंतरिम जामिनावर सुटलेल्या कबीर कला मंचचा विद्रोही कवी सचिन माळी आणि शाहीर शीतल साठे यांनी नवयान या नव्या कलापथकाची घोषणा केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ शाहीर संभाजी भगत, दिग्दर्शक आनंद पटवर्धन, आमदार कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते विलास रुपवते आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या पथकाची घोषणा करण्यात आली.
यावेळी सचिन माळी म्हणाले की, चार वर्षे नक्षलवादाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आले. त्याआधी दोन वर्षे भूमिगत होतो. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनीमुळे संविधानावर विश्वास आहे. याआधीही कबीर कला मंचच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत होतो. यापुढे नवयान या नव्या पथकाच्या माध्यमातून विद्रोही महाजलशा राज्यासमोर सादर केला जाईल. जातीअंत करण्यासाठी सांस्कृतिक क्रांतीची गरज आहे. नवयान हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धम्म विचार असल्याने त्यात बाबासाहेबांनी गुरू मानलेल्या बुद्ध कबीर, फुले या सर्व विद्रोही व समतावादी परंपरेचा समावेश आहे. संविधानाच्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या स्वप्नांना प्रमाण मानून लोकशाही मार्गानेच प्रबोधन करण्याची भूमिका स्वीकारणार असल्याचे माळी यांनी सांगितले.
शाहीर शीतल साठे म्हणाल्या की, जातीअंताचा कार्यक्रम प्रबोधनातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी पोषण वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असेल. संविधानाची मूल्यं लोकांना सांगून समतेचे व्रत पुढे घेऊन जाणार आहे. ठिकठिकाणी कार्यक्रम करताना परवानग्या मिळवण्यात अडचणी येत आहेत. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता आणि धमक्यांना भीक न घालता राज्यभर प्रबोधन करण्याचा विश्वास साठे यांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रबोधनाच्या चळवळीशिवाय राजकीय क्रांती शक्य नसल्याचे मत शाहीर संभाजी भगत यांनी व्यक्त केले. अतिरेकी वादातून नव्हे, तर समन्वयाच्या माध्यमातूनच क्रांती घडत असते, असे प्रतिपादन आमदार कपिल पाटील यांनी केले.
कोल्हापुरात रंगणार विद्रोही महाजलसा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांतून नवयान छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये पहिला प्रयोग सादर करणार आहे. त्यानंतर राज्यात विविध ठिकाणी नवयानच्या माध्यमातून जाती विषमता, आर्थिक विषमता आणि लैंगिक विषमतेविरोधात आवाज उचलला जाईल. या पथकाच्या माध्यमातून शाहिरी आवाजात कला, कविता आणि लेखणी लोकशाहीची बोली बोलतील, असा शीतल साठे यांनी व्यक्त केला.