Join us  

Video: अमृता फडणवीस यांचा सेल्फी स्टंट, मुख्यमंत्री-गडकरीही पाहातच राहिले!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 8:35 PM

सेल्फी स्टंटचं वेड कुणालाच गप्प बसून देत नाही. या सेल्फी स्टंटच्या यादीत आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांचेही नाव आले आहे.

मुंबई - सेल्फी स्टंटचं वेड कुणालाच गप्प बसून देत नाही. या सेल्फी स्टंटच्या यादीत आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांचेही नाव आले आहे. कारण, अमृता फडणवीस यांचा सेल्फी काढतानाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरलही होत आहे. त्यामध्ये अमृता फडणवीस क्रुझच्या टोकाला बसून सेल्फी काढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, पोलीस यंत्रणांसह इतरही अधिकारी सौ. फडणवीसांचा हा सेल्फी स्टंट पाहात असल्याचे या व्हिडीओत दिसून येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 च्या निवडणूक प्रचारादरम्यान कमळासोबत एक सेल्फी काढला अन् भारतातील तरुणाईला सेल्फीचं याडच लागलं. तेव्हापासून सुरू झालेलं सेल्फीचं वेड दिवसेंदिवस वाढतच आहे. या सेल्फी क्रेझी तरुणाईचे स्टंट पाहून दिग्गजांनाही सेल्फीचा मोह आवरता येत नाही. अडवेंचर करताना, एखाद्या पर्यटनस्थळी किंवा काहीतरी हटके ठिकाणी गेल्यानंतर हे सेल्फीवेड जाग होतं. अशा ठिकाणी न कळत स्टंट करत सेल्फी काढले जातात. या स्टंट सेल्फीमुळे अनेक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनही सेल्फी स्टंटविरुद्ध जनजागृती करण्यात येते. तसेच पर्यटनस्थळी सेल्फी न काढण्याचे किंवा काढताना सावधानता बाळगण्याचे बोर्डही झळकवण्यात येतात. मात्र, आता तर चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीच सेल्फी स्टंट केला आहे. 

मुंबई-गोवा मार्गावरील 'आंग्रिया' क्रुझच्या उद्घाटनप्रसंगी सेल्फी घेण्याचा मोह अमृता फडणवीस यांनाही आवरता आला नाही. विशेष म्हणजे, या क्रुझच्या टोकाला जाऊन सेल्फी घेण्याचे धाडस अमृता यांनी केलं. त्यामुळे क्रुझवर उपस्थित सुरक्षा रक्षकांचा आणि संबंधित अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, एखदाचा सेल्फी घेऊन सुरक्षितपणे अमृता फडणवीस माघारी परतल्यानंतर पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर आणि बॉडिगार्डचा जीव भांड्यात पडला. या क्रुझवर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज अधिकारी उपस्थित होते. मात्र, मिसेस मुख्यमंत्र्यांचा हा सेल्फीस्टंट मुख्यमंत्री अन् गडकरीही पाहातच राहिले.

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीससेल्फीगोवामुंबई