Join us

संयुक्त महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विदर्भ, उ.महाराष्ट्र, मराठवाडा गायब - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 02:50 IST

पुण्याच्या जिल्हा योजनेचे आकारमान २३ टक्क्यांनी वाढविले आणि नागपूर विभागाचे आकारमान १७ टक्क्यांनी कमी केले

मुंबई : उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा संयुक्त महाराष्ट्राचा असेल तर त्यातून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र गायब कसे? शिवसेनेला कोकणानेही भरभरून दिले पण त्याकडेही पूर्ण दुर्लक्ष. हा अर्थसंकल्प एकांगी आणि प्रादेशिक असमतोल वाढविणारा आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली.

अजित पवार यांनी ६ मार्चला सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला फडणवीस सुरुवात करताना फडणवीस यांनी चौफेर टीका केली. संयुक्त महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नागपूर मेट्रो येते काय किंवा नाशिक मेट्रो येते काय, हेच आम्हाला जाणून घ्यायचे आहे.औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेले. तेथे करायचे होते, तर दुसरे करायचे. पण औरंगाबादचे का हिसकून घेतले. मराठवाड्यातील वॉटरग्रीडसाठी केवळ २०० कोटी आणि वरळीतील पर्यटन केंद्रासाठी एक हजार कोटी , हा या सरकारचा प्राधान्यक्रम आहे का असा सवाल फडणवीस यांनी केला.

पुण्याच्या जिल्हा योजनेचे आकारमान २३ टक्क्यांनी वाढविले आणि नागपूर विभागाचे आकारमान १७ टक्क्यांनी कमी केले. कुणाचे वाढविण्याला आमची हरकत नाही, पण, इतरांचे कमी का करता? असे फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही सरसकट नाही. त्यातून दिलेल्या वचनाप्रमाणे सात-बाराही कोरा होणार नाही. आम्ही आश्वासन दिलेले नसताना कर्जमाफी केली. पूर्ण आमची पद्धत अंगिकारून ही नवीन कर्जमाफी जाहीर केली आहे.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअर्थसंकल्प