मताधिक्याचा विजय असो...

By Admin | Updated: October 20, 2014 02:38 IST2014-10-20T02:38:47+5:302014-10-20T02:38:47+5:30

मुंबई शहर आणि उपनगरातील ३६ विधानसभांचा निकाल लागला आणि भल्याभल्यांचे पानिपत झाले.

The victory of the franchise ... | मताधिक्याचा विजय असो...

मताधिक्याचा विजय असो...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील ३६ विधानसभांचा निकाल लागला आणि भल्याभल्यांचे पानिपत झाले. विशेषत: विजयी उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकावरच्या उमेदवारांना पडलेली मते आणि त्यामधील मताधिक्यामुळे अनेकांना तोंडात बोटे घालावी लागली. अशाच मताधिक्यामुळे विनोद तावडे, सरदार तारासिंग, योगेश सागर, राम कदम व मंगल प्रभात लोढा या दिग्गजांनी राजकारणाची समीकरणेच बदलली.
आघाडी आणि महायुतीमध्ये फूट पडली आणि मुंबईसह महाराष्ट्रात पंचरंगी निवडणूक रंगली. मुंबई आणि उपनगरात मिळून ३६ विधानसभा जागा असल्याने सगळ्यांचेच मुंबापुरीकडे लक्ष लागून राहिले. सर्वाधिक मते खेचून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मैदानी सभा रंगल्या; आणि रविवारी लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भल्याभल्यांना तोंडात बोटे घालावी लागली.
पश्चिम उपनगरात बोरीवलीमध्ये भाजपाचे विनोद तावडे हे तब्बल ७१ हजार २६७च्या फरकाने विजयी झाले. दहिसरमध्ये भाजपाच्या मनीषा चौधरी ३८ हजार ५९४ मतांच्या फरकाने विजयी झाल्या. मुलुंडमध्ये भाजपाचे तारासिंग हे ६५ हजार ३०७ मतांच्या फरकाने विजयी झाले. विक्रोळीमध्ये शिवसेनेचे सुनील राऊत यांनी २५ हजार ३३९ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. जोगेश्वरीमध्ये शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी २८ हजार ९६२ मतांच्या फरकांनी बाजी मारली.
चारकोप येथे भाजपाचे योगेश सागर हे ६४ मतांच्या ३६७ फरकाने विजयी झाले. वर्सोव्यात भाजपाच्या भारती लव्हेकर यांनी २६ हजार ३९८ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. अंधेरी पश्चिम येथे भाजपाचे अमित साटम हे २४ हजार ४० मतांच्या फरकाने विजयी झाले. विलेपार्ल्यात भाजपाच्या पराग अळवणी यांनी ३२ हजार ४३५ मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली. चांदिवली येथील काँग्रेसचे उमेदवार नसीम खान हेदेखील २९ हजार ४६९ मतांच्या फरकाने विजयी झाले.
घाटकोपर पश्चिम येथे मनसेमधून भाजपात प्रवेश केलेल्या राम कदम यांनी तर ४१ हजार ९९६ मतांच्या फरकाने बाजी मारली. वांद्रे पश्चिमेकडून भाजपाचे आशिष शेलार २६ हजार ९११ मतांच्या फरकाने विजयी झाले. वरळी येथून शिवसेनेचे सुनील शिंदे हे २३ हजार १२ मतांच्या फरकाने विजयी झाले. शिवडी येथून मनसेचे बाळा नांदगावकर यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या अजय चौधरी यांनी ४१ हजार ९०९ मतांच्या फरकाने विजय नोंदवला. मलबार हिल येथून भाजपाचे मंगलप्रभात लोढा हे तब्बल ६८ हजार ८८६ मतांच्या फरकाने विजयी झाले. कुलाबा येथून भाजपाच्या राज पुरोहित यांनी २३ हजार ७८७ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. एकंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल जसा मोदी लाटेने गाजला तसा तो मतांच्या फरकानेही गाजला; आणि अनपेक्षित असे निकाल हाती लागल्यानंतर दिग्गजांचे पानिपत झाले. (प्रतिनिधी)

Web Title: The victory of the franchise ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.