मद्यपी चालकाने घेतला महिलेचा बळी
By Admin | Updated: September 9, 2015 05:11 IST2015-09-09T05:11:40+5:302015-09-09T05:11:40+5:30
विधी सल्लागार जान्हवी गडकर हिट अॅण्ड रनप्रकरण ताजे असतानाच माहीम येथे दारू पिऊन भरधाव गाडी चालवत मद्यपी तरुणाने एका महिलेला चिरडले. त्यात तिचा बळी गेला असून

मद्यपी चालकाने घेतला महिलेचा बळी
मुंबई : विधी सल्लागार जान्हवी गडकर हिट अॅण्ड रनप्रकरण ताजे असतानाच माहीम येथे दारू पिऊन भरधाव गाडी चालवत मद्यपी तरुणाने एका महिलेला चिरडले. त्यात तिचा बळी गेला असून, चौघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, पीडित महिलेची मान देहापासून वेगळी होऊन १० फूट लांब फेकली गेली.
कृष्णा अग्रवाल (४२) ही महिला या घटेनत जागीच ठार झाली. ही महिला कांदिवली येथे वास्तव्यास होती. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी ही महिला व तिचे कुटुंब सोमवारी रात्री घरातून निघाले. माहीम येथे फुटपाथवर विश्रांतीसाठी बसले असतानाच पहाटे ४च्या सुमारास इनोवा गाडीने या कुटुंबाला धडक दिली. त्यात कृष्णा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत कृष्णा यांची मुलगी रिया व तिच्या मैत्रिणी जखमी झाल्या आहेत. यातील तिघी जणी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहीम येथील घटना, चार जण जखमी
ही घटना घडल्यानंतर यातील मद्यपी चालक नॅथनियल एसून मुख्तीयार (२०) गाडी भरधाव चालवत तेथून पळ काढत होता. मात्र तेथे असलेल्या नागरिकांनी त्याला अटकाव केला व पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मुख्तीयारला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अशी घडली घटना
कांदिवली पश्चिमेकडील एकतानगर येथील सप्तर्षी टॉवरमध्ये कृष्णा आपल्या कुटुंबीयांसोबत राहण्यास होत्या. सोमवारी रात्री ११च्या सुमारास मुलगी रिया आणि तिच्या तीन मैत्रिणी, भूमी सिंग, नयना सिंग आणि अदिती यांच्यासोबत कांदिवली येथून सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी निघाल्या. कृष्णा यांचा नवस असल्याने त्या पायीच दर्शनासाठी निघाल्या होत्या. पहाटे ४च्या सुमारास माहीम येथील स्वामी विवेकानंद गार्डन परिसराजवळील फुटपाथवर हे सर्व जण विश्रांतीसाठी बसले होते. त्याचवेळी दारूच्या नशेत भरधाव सुटलेल्या इनोवा कारचालकाने फुटपाथवर बसलेल्या कृष्णासह इतर चौघांना चिरडून रस्त्याकडेला फेकले. हा अपघात इतका भीषण होता की, कृष्णा यांची मान देहापासून वेगळी होऊन दुसरीकडे फेकली गेली.