प्रेयसीवर चाकू हल्ल्यानंतर ‘त्याचा’ आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: January 22, 2015 01:44 IST2015-01-22T01:44:02+5:302015-01-22T01:44:02+5:30
भर दिवसा, भर रस्त्यात एका तरूणाने तरूणीवर चाकूचे सपासप वार केले. त्यानंतर तोच चाकू स्वत:च्या मानेवर फिरवला.

प्रेयसीवर चाकू हल्ल्यानंतर ‘त्याचा’ आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई: भर दिवसा, भर रस्त्यात एका तरूणाने तरूणीवर चाकूचे सपासप वार केले. त्यानंतर तोच चाकू स्वत:च्या मानेवर फिरवला. हा थरार बुधवारी दुपारी चारच्या सुमारास मालाड पश्चिमेकडील मढ परिसरात घडला. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती मालवणी पोलीस देतात.
ब्रायन फर्नांडिस(२२) असे हल्लेखोर तरूणाचे नाव आहे. तो जुहूचा रहिवासी आहे. ब्रायनचे मढ येथे राहणाऱ्या तरूणीसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यामुळे दुपारी चारच्या सुमारास कॉलेजमधून घरी परतणाऱ्या तरूणीला परिसरातील सामरा इस्टेट येथे गाठले. राग अनावर झाल्याने ब्रायनने दडवून आणलेला चाकू बाहेर काढला. तो पाहून ती घाबरली आणि पळू लागली. ब्रायनने तिची पाठ घेतली आणि तिच्यावर चाकूचे सपासप वार केले. यानंतर त्याने त्याच चाकूने स्वत:वरही वार करून घेतले आणि समुद्राच्या दिशेने पळाला. हा थरार पाहाणाऱ्यांनी दोघांना परिसरातल्या खासगी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, प्रकरण मालवणी पोलिसांना समजताच त्यांनी रूग्णालयात धाव घेतली. तरूणीचा जबाब नोंदवून त्याआधारे गुन्हा नोंदविला. उपचारांनंतर तरूणीची प्रकृती स्थीर असल्याची माहिती रूग्णालयाने पोलिसांना कळविली. मात्र ब्रायनची प्रकृती गंभीर असल्याचाही निरोध धाडला.