चिपळूणची महिला वाहक माळीण दुर्घटनेची बळी

By Admin | Updated: August 18, 2014 23:31 IST2014-08-18T22:52:47+5:302014-08-18T23:31:14+5:30

गरोदरपणाच्या रजेवर त्या आपल्या घरी माळीण येथे गेल्या होत्या.

The victim of the carrier Malini accident victim of Chiplun | चिपळूणची महिला वाहक माळीण दुर्घटनेची बळी

चिपळूणची महिला वाहक माळीण दुर्घटनेची बळी

अडरे / चिपळूण : माळीण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चिपळूण एस.टी. आगारातील एका महिला वाहकाचा समावेश असल्याची माहिती नुकतीच पुढे आली आहे. सरस्वती जठार असे त्यांचे नाव असून, गरोदरपणाच्या रजेवर त्या आपल्या घरी माळीण येथे गेल्या होत्या. या दुर्घटनेने त्यांचा आणि ज्याने अजून आयुष्य पाहिलेलेही नव्हते, अशा निष्पाप बाळाचाही अंत झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर ३० जुलैला अस्मानी संकट कोसळले. या नैसर्गिक संकटाने संपूर्ण गावच गाडला गेला. होत्याचं नव्हतं झालं. शेकडो माणसे काळाच्या जबड्यात ओढली गेली. यामध्ये चिपळूण आगारातील वाहक सरस्वती विठ्ठल जठार (वय २६, रा. माळीण) यांचा समावेश होता. एक वर्षापूर्वी चिपळूण आगारात त्या वाहक म्हणून सेवेत रुजू झाल्या होत्या. त्या बाळंतपणासाठी रजेवर गावी गेल्या होत्या.
आपल्या आयुष्यात नवा जीव येणार, आपल्याला मातृत्वाचे सुख लाभणार म्हणून त्या अतिशय आनंदात होत्या; पण नियतीला ते मान्य नव्हते. ३० जुलैच्या त्या दुर्दैवी घटनेत त्यांचा आणि त्यांच्या उदरात उमलणाऱ्या जिवाचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या निधनाची बातमी चिपळूण आगाराला कळताच अनेकांचे मन हेलावले व नकळत डोळ्यांत पाणी टपकले.
माळीणच्या घटनेचा फटका सावर्डे येथील वनखात्यात गार्ड म्हणून काम करणाऱ्या गंगाराम झांजरे यांनाही बसला. सरस्वती ही त्यांच्या पत्नीची भाची होती. या घटनेत झांजरे यांची वहिनी, चुलती व भावाची दोन लहान मुले यांच्याबरोबरच त्यांच्या सासूरवाडीतील आठजण मृत्युमुखी पडले.
या दुर्घटनेत मारले गेलेले अनेकजण झांजरे यांचे जवळचे नातेवाईक होते. ३० जुलैला वहाळ गावी सेवेत असताना त्यांना ही बातमी समजली व तत्काळ ते घटनास्थळी रवाना झाले होते. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. (प्रतिनिधी)

मालकी हक्क शाबूत करण्यासाठी पायपीट
माळीण दुर्घटनेत ज्यांची घरेदारे उद्ध्वस्त झाली त्या सर्वांना आता आपला हक्क आणि अधिकार शाबूत करण्यासाठी असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तहसील कार्यालय सील करण्यात आले आहे. शिवाय एकत्र कुटुंब पद्धतीत भावाच्या नावावर असलेल्या घरावर इतर भावांचा हक्क असतो; परंतु ज्याच्या नावे घरपट्टी होती त्यांनाच पुनर्वसनात लाभ मिळणार आहे. त्यामुळे सख्खे नातेवाईक असूनही आता उरावर दगड ठेवून आपला मालकी हक्क शाबूत करण्यासाठी या पीडितांना पायपीट करावी लागत आहे.

Web Title: The victim of the carrier Malini accident victim of Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.