कुलगुरू वेळुकरांचा आज विद्यापीठात निरोप समारंभ
By Admin | Updated: July 6, 2015 03:18 IST2015-07-06T03:18:57+5:302015-07-06T03:18:57+5:30
गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत राहिलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांचा कार्यकाळ सोमवारी संपुष्टात येत आहे.

कुलगुरू वेळुकरांचा आज विद्यापीठात निरोप समारंभ
मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत राहिलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांचा कार्यकाळ सोमवारी संपुष्टात येत आहे. विद्यापीठातील विविध संघटनांकडून वेळुकर यांचा निरोप समारंभ दिक्षान्त सभागृहात सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला असून याला सिनेट सदस्य, विविध विद्यार्थी आणि प्राध्यापक संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
डॉ. वेळुकर यांनी ६ जुलै २०१० रोजी कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या नियुक्तीपासून ते विविध निर्णयांवर सिनेट सदस्यांपासून ते प्राध्यापक संघटनांनी आक्षेप घेतल्याने वेळुकर सतत चर्चेत राहिले. वेळुकर यांच्या कार्यकाळात परीक्षेची के्रडिट आणि ग्रेडिंग सिस्टीम सुरू झाली. तसेच मॉडर्न महाविद्यालये सुरू झाली. तसेच पेपरफुटी ते विलंबाने जाहीर होणारे निकाल यावरूनही त्यांच्यावर टीका झाली. त्यांच्या वादग्रस्त नियुक्ती प्रकरणामुळे ते पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील काय याची चर्चा सतत झाली.
वेळुकरांसह माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र, महाविद्यालये व विद्यापीठ मंडळाचे संचालक डॉ. राजपाल हांडे, माजी कुलसचिव कुमार खैरे, माजी परीक्षा नियंत्रक पद्मा देशमुख यांना विविध संघटनांच्या वतीने निरोप देण्यात येणार आहे. तर नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचा स्वागत समारंभही संघटनांनी आयोजित केला आहे.