ज्येष्ठ पत्रकार, कामगार नेते, वसंत प्रधान यांचे निधन
By Admin | Updated: February 3, 2015 01:48 IST2015-02-03T01:48:26+5:302015-02-03T01:48:26+5:30
ज्येष्ठ पत्रकार, कामगार नेते, स्वातंत्रसैनिक आणि लेखक वसंत प्रधान यांचे रविवारी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ९० वर्षे होते.

ज्येष्ठ पत्रकार, कामगार नेते, वसंत प्रधान यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, कामगार नेते, स्वातंत्रसैनिक आणि लेखक वसंत प्रधान यांचे रविवारी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी वकील किसन प्रधान, मुली कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती निशिता म्हात्रे, येल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ दीप्ती प्रधान आणि मुलगा संगीतकार अनिश प्रधान असे कुटुंब आहे.
१६ जून १९२४ रोजी जन्मलेल्या वसंत प्रधान यांनी १९४२ साली सामाजिक कार्य सुरू केले. भारत छोडो चळवळीदरम्यान त्यांना अटक झाली होती. त्यांचे वडील गंगाधर प्रधान हे पोस्टमास्टरची बदलीची नोकरी करीत असल्याने वसंत प्रधान यांना आपले शिक्षण अलिबाग, जळगाव, मुंबई आणि बडोदा या शहरांमध्ये घ्यावे लागले. ते कला शाखेच्या इंटर आर्ट्सपर्यंत पोहोचले तरी विद्यार्थी आणि कामगार चळवळीमध्ये सक्रिय होते. समाजवादी पक्षासह मिल मजदूर सभेत कार्यरत असताना ते ज्येष्ठ पत्रकार जी.एम. चिटणीस यांच्या संपर्कात आले. चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान यांनी मराठी दैनिक ‘चित्रा’तून पत्रकारितेला सुरुवात केली. ते या दैनिकाचे संपादकदेखील झाले. १९५६ साली प्रधान यांनी पत्नी किरण यांच्या सोबतीने ‘झुंझार’ हे मराठी सायंदैनिक सुरू केले. हे सायंदैनिक १० वर्षे चालले. १९६९ साली प्रधान हे ‘लोकसत्ता’ या दैनिकात रुजू झाले आणि १९८४ साली ते निवृत्त झाले. वसंत प्रधान हे मणी भवन गांधी संग्रहालयाचे अध्यक्ष, गांधी स्मारक निधीचे मानद सचिव व गांधी फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष होते. (प्रतिनिधी)