Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ बासरीवादक पं. रोणू मजूमदार यांना ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 07:39 IST

‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’चे निशाल बारोटजी आणि रिचर्ड स्टेनिंगजी यांच्या हस्ते पं. रोणू मुजूमदार यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

मुंबई : ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मजूमदार यांनी ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ल्यावर ५४६ संगीतकारांची अपूर्व सिम्फनी सादर करत इतिहास रचला. या सादरीकरणासाठी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने जगातील सर्वांत मोठ्या सिम्फनीद्वारे सादर झालेले संगीत म्हणून मान्यता देत विक्रम नोंदवला आहे. ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकृत समारंभात पं. रोणू मजूमदार यांना गौरविण्यात आले.

‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’चे निशाल बारोटजी आणि रिचर्ड स्टेनिंगजी यांच्या हस्ते पं. रोणू मुजूमदार यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यासाठी त्यांनी मध्य प्रदेश सरकार, सांस्कृतिक विभाग, मुख्यमंत्री मोहन यादव, तसेच केंद्र सरकारचे मन:पूर्वक आभार मानले. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेसुद्धा उपस्थित होते. पं. रोणू मजूमदार यांची सांगीतिक कारकीर्द त्यांचे वडील डॉ. भानू मजूमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. नंतर दिवंगत पं. लक्ष्मण प्रसाद जयपूरवाले आणि प्रख्यात पं. विजय राघव राव यांच्या मार्गदर्शनाखाली फुलली. 

मैहर घराण्याशी असलेल्या त्यांच्या सखोल नात्यामुळे त्यांनी लहान वयातच बासरीत प्रावीण्य मिळवले आणि भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. नव्या जमान्याच्या संगीताच्या बाबतीत कल्पकता दाखवणाऱ्या  मजूमदार यांनी ‘अ ट्रॅव्हलर्स टेल’, ‘कोई अकेला कहाँ’ या अल्बमसह ‘प्रायमरी कलर्स’ या हॉलिवूड चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे.

माझी रचना ‘समवेत’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेल्याचा अभिमान आहे. ५४६ संगीतकारांच्या ‘सर्वांत मोठ्या हिंदुस्थानी शास्त्रीय बँड’चा संगीतकार व संचालक असल्याचा सन्मान मला मिळाला आहे. ५४६ संगीतकारांसह सर्वांत मोठा भारतीय ऑर्केस्ट्रा सादर करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवणे ही अभिमानाची गोष्ट आहे. ‘समवेत’ ही रचना तीन रागांवर आधारित होती. यात मियाँ मल्हार, मियाँ गिटोडी आणि दरबारी हे राग असून, या रागांनीच हा प्रतिष्ठेचा विक्रम गाठण्यास मदत केली.     - पंडित रोणू मजूमदार,    ज्येष्ठ बासरीवादक

टॅग्स :गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड