Join us  

वेसावे कोळीवाड्यात उत्साहात साजरा झाला शिमगा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 10:58 AM

राज्यात मासेमारीत प्रथम क्रमांकावर असलेला अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 6 किमीवर असलेल्या वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - मुंबईतील सर्वात मोठा कोळीवाडा आणि राज्यात मासेमारीत प्रथम क्रमांकावर असलेला अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 6 किमीवर असलेल्या वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. येथील बाजार गल्ली व मांडवी गल्लीच्या कोळी महिलांची काल रात्री 9.30 वाजता निघसलेली हावलीची मडकी मिरवणूक नेत्रदीपक होती. या दोन गल्लीच्या सुमारे 600 कोळी महिलांनी पारंपरिक वेषात डोक्यावर रंगीत मडकी घेऊन आणि अटकेपार लोकप्रिय असलेल्या वेसावकरांच्या कोळी गीतांच्या तालावर आणि येथील बँड पथकाच्या निंनादात या मडकी मिरवणुकीत उत्साहात सहभाग घेतला. यावेळी वेसावकरांनी आणि येथील परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.तर परदेशी पाहुणे आणि येथील हावलीचे दृश्य आपल्या कॅमेरात बंदिस्त करण्यासाठी अनेक छायाचित्रकारांनी येथे आवर्जून भेट दिली, तर सेल्फी काढण्यासाठी तरुणाचा उत्साह ओसंडून वाहत होता. येथील मडकी मिरवणुकीची एक आगळी वेगळी पुरातन परंपरा आहे, अशी माहिती बाजार गल्ली कोळी जमत संस्थेचे अध्यक्ष पराग भावे यांनी सांगितले. तर येथील अनेक कोळी बांधवांनी विविध देवी-देवतांचे अथवा इतर सोंग घेत सादर करत आणि सुमधुर कोळीगीत वाजवणाऱ्या कोळी बँड पथकांच्या तालावर या मिरवणुकीत सहभाग घेतला, अशी माहिती येथील एमबीए तरुण मोहित रामले व राखी धाकले (खर्डे ) यांनी दिली.वेसावे गावातील आमच्या मांडवी गल्ली सह तेरे गल्ली, बुधा गल्ली, पाटील गल्ली, गोमा गल्ली, बाजार गल्ली, डोंगरी गल्ली, शिव गल्लीया विविध गल्ल्या देखील दरवर्षी मोठ्या उत्साहात येथील होलिका उत्सवात सहभागी होतात, अशी माहिती मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष जगदीश भिकरू व उपाध्यक्ष मनोज कासकर यांनी सांगितले. हावलीला अग्नी देण्याचा मान मांडवी गल्ली जमातीच्या अध्यक्षाला दिला जात असे. मात्र यंदापासून मांडवी गल्ली जमातीच्या कुुुटुंबाला हा मान देण्याचा निर्णय आम्ही घेतला असूूून हा मान प्रथम मासळी परिवाराला दिला असल्याची माहिती संस्थेचे विरेंद्र मासळी यांनी दिली.मध्यरात्री रात्री होळीभोवती मडकी रचून, प्रदक्षिणा घालत वाजतगाजत नाचत होळी पेटवली गेली, असे राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांनी सांगितले. रात्री १२ ते १ च्या सुमारास होळीभोवती मडकी रचून, प्रदक्षिणा घालत वाजतगाजत होळी पेटवली जाते, असे राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांनी सांगितले.

टॅग्स :होळी