Join us  

Video - 'आमच्या दाराशी हाय शिमगा', वेसाव्यातील होळीची आगळी वेगळी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:12 PM

शिमगा अथवा होळीकोत्सव हा महाराष्ट्रातील कोळी जमातीचा महत्त्वाचा व आनंद साजरा करण्याचा सण. आजही वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे.

ठळक मुद्देआजही वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे.पारंपरिक साज लाभलेल्या होळीने वेसाव्याची शान आणखी वाढली आहे. कोळीवाड्यात शिमग्याला गल्लो गल्लीत "टिमखे बाजा, घुमट"  वाजत व त्या जोडीला विशिष्ट नाच पाहायला मिळतो म्हणजे डांगर्यांचा.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - शिमगा अथवा होळीकोत्सव हा महाराष्ट्रातील कोळी जमातीचा महत्त्वाचा व आनंद साजरा करण्याचा सण. आजही वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. सन शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला, तुम्ही हावली भवती नाचा हो, हावली भवती नाचा असे गीत गात येथील बाजार गल्ली व मांडवी गल्लीच्या कोळी महिलांची हावलीला निघणारी  मडकी(मटकी) मिरवणूकीला एक आगळी वेगळी परंपरा आहे.

मुंबईतील वेसावे गावच्या होळीची मजा आणि पारंपरिक थाट काही औरच आहे. येथील हावली पाहण्यासाठी परदेशी पाहुणे आवर्जून वेसाव्यात येत असल्याने, पारंपरिक साज लाभलेल्या होळीने वेसाव्याची शान आणखी वाढली आहे. येथे गोताच्या किंवा पाटलांच्या हावलाच्या दिवशी पारंपरिक वेशभूषेत बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास मडकी मिरवणूक काढली जाते. ज्यात वेसावे गावातील बाजार गल्ली व मांडवी गल्ली जमातीचा सहभाग असतो. कोळी महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर रंगीत मातीचे मडके घेऊन गावात मिरवतात. त्याचप्रमाणे पुरुष मंडळी विविध देवी-देवतांचे अथवा इतर सोंग घेत सादर करत अथवा गाणी म्हणत गावात फिरतात. त्यांना साथ असते ती सुमधूर कोळीगीत वाजवणाऱ्या कोळी बँड पथकांची. त्याचबरोबर वेसावे गावातील ९ गल्ल्या दरवर्षी मोठ्या उत्साहात होळी साजरी करतात अशी माहिती मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष जगदीश भिकरू व उपाध्यक्ष मनोज कासकर यांनी सांगितले. या जमातीत यापूर्वी हा मान जमातीच्या अध्यक्षाला दिला जात असे, मात्र यंदापासून जमातीच्या कुटुंबाला हा मान देण्याचा निर्णय घेतला असून हा मान प्रथम मासळी परिवाराला दिला असल्याची माहिती संस्थेचे सचिव मितेष चाके व खजिनदार नरेश कोळी यांनी सांगितले.

बाजार गल्ली जमातीची हावली निमित्त निघणारी मडकी  मिरवणूक नेत्रदीपक असते अशी माहिती  बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष पराग भावे व सचिव निकेश दवणे यांनी दिली. शिमगा अथवा होलीकोत्सव हा महाराष्ट्रातील कोळी जमातीचा महत्त्वाचा व आनंद साजरा करण्याचा सण. मुळात कोळी लोकांची हावली ही १५ दिवस साजरी होते. सुरुवात होते ती गावातील लहान मुलांच्या होळीपासून. पण शेवटचे दोन दिवस होलीका दहनासाठी महत्त्वाचे मानले जातात. होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या होळीला कोळी भाषेत कोमार/कोंबार हावली म्हटले जाते; जी गावातील तरुण पोरे साजरी करतात. होळी पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या होळीला गोताची हावली किंवा पाटलाची होळी म्हणतात. याचा मान गावचा पाटील अथवा गल्लीच्या अध्यक्षाला असतो. होळी पेटवताना बोंबा मारण्याची परंपरा पाहायला मिळते. रात्री १२ ते १ च्या सुमारास होळीभोवती मडकी रचून, प्रदक्षिणा घालत वाजतगाजत होळी पेटवली जाते, असे राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांनी सांगितले. 

कोळ्यांचा डांडीया रास म्हणजेच पारंपरिक डांगर्या! 

नवरात्रीत आपण गरबा, डांडीया असा गुजरातमधील पारंपरिक नाच पाहिलाच असेल पण मंडळी जसा गुजरातचा गरबा अथवा मध्य प्रदेशचा डांडीया प्रसिद्ध आहे तसाच डांडीयाचा प्रकार कोळी समाजात देखील पाहायला मिळतो.कोळी बोली भाषेत त्या पारंपारीक नृत्य प्रकाराला "डांगर्या" असे म्हणतात. पण हे डांगर्या कोळी बांधव खेळतात ते शिमगा अथवा हावली (होळी) च्या सणाला अशी माहिती वेसावा कोळीवाड्यातील मोहित रामले यांनी दिली.

पुर्वी कोळीवाड्यात शिमग्याला गल्लो गल्लीत "टिमखे बाजा, घुमट"  वाजत व त्या जोडीला विशिष्ट नाच पाहायला मिळतो म्हणजे डांगर्यांचा. कोळी बांधव खासकरून कोळी महिला हातात डांड्या घेऊन, "जोय जा अरे सोय जा, रावणाची नजर हाय सीतेवरी न सीतेची नजर हाय रामावरी, आंब्याची डांगली चिंचेवरी न चिंचेची डांगली आंब्यावरी."असे गमतीशीर पारंपरिक कोळीगीत गात एकमेकींच्या हातातील डांगर्यांवर (डांडीयांवर) मारीत. आणि मग हावलाय (होळी) भवती गोलाकार फिरत डांगर्या मारत आनंद व्यक्त करीत.

आजही मुंबईतील मनोरी, मालवणी, एक्सर, वजीरा कोळीवाड्यांमध्ये होळीच्या दिवसात म्हणजे विशेष करून कोंबार हावली (कुमारांची होळी) व गोताची अथवा पाटलाची हावली (होळी पोर्णिमा) या दिवसात डांगर्या मारण्याचा नृत्य पाहायला मिळतं. मनोरी गावात देखील डांगर्या खेळताना कोळी महिला,"हावलय चंदन बागेन उभी गो हावलय चंदन बागेन उभी" असे होळीका स्तुतीचे गीत म्हणतात अशी माहिती मोहित रामले याने शेवटी दिली.

टॅग्स :होळी