Join us  

आम्ही नाही जाss; लहान पक्षांना जागा देण्यावरून मोठ्या-छोट्या भावात खटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 7:11 AM

विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, युतीमध्ये रिपाइं, रासप, शिवसंग्राम, स्वाभिमानी रयत संघटना

यदु जोशी 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी भाजप-शिवसेना यांच्यातील पहिली बैठक आज झाली. महायुतीतील लहान मित्रपक्षांना कोणत्या जागा सोडायच्या यावरून यावेळी एकमत न झाल्याने पुन्हा चार दिवसांनी बैठक घेण्याचे ठरले.भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन, तर शिवसेनेतर्फे उद्योग मंत्री सुभाष देसाई या चर्चेत सहभागी झाले. चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या आजच्या बैठकीत लहान मित्रपक्षांना सोडावयाच्या जागा हा मुख्य विषय होता.

विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, युतीमध्ये रिपाइं, रासप, शिवसंग्राम, स्वाभिमानी रयत संघटना अशा लहान पक्षांना भाजपने त्यांच्या कोट्यातून जागा द्याव्यात कारण ते भाजपचे मित्रपक्ष आहेत, अशी भूमिका शिवसेनेने आजच्या बैठकीत घेतली. मात्र, भाजपने हा प्रस्ताव फेटाळला. लहान मित्रपक्ष हे महायुतीचे घटक आहेत आणि त्यांना जागा देण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांची आहे, त्यामुळे आधी या लहान पक्षांसाठी २० ते २२ जागा सोडून अन्य जागांचे भाजप-शिवसेनेत वाटप व्हावे, अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली. त्यामुळे लहान मित्र पक्षांच्या जागांबाबत कोणतेही एकमत आजच्या बैठकीत होऊ शकले नाही. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मंगळÞवारी रात्री झाली. या बैठकीत युतीमध्ये १७१ जागा मागायच्या अशी भूमिका ठरवण्यात आली. मात्र, आाजच्या युतीच्या बैठकीत लहान मित्रपक्षांचा विषय होता, असे सूत्रांनी सांगितले.

महायुतीच्या चर्चेत भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी व आणखी एक मंत्री सहभागी होऊ, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार दिवसांपूर्वी माध्यमांना सांगितले होते. आज पाटील आणि गिरीश महाजन सहभागी झाले. मुनगंटीवार हे पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी नागपुरात होते.

टॅग्स :शिवसेनाभाजपानिवडणूकमुंबई