पहिल्याच दिवशी पालघरात सर्वाधिक बरसला
By Admin | Updated: July 4, 2014 00:59 IST2014-07-04T00:59:58+5:302014-07-04T00:59:58+5:30
आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण जून महिन्याने हुलकावणी दिल्यानंतर काल बुधवारपासून पालघर व पूर्ण परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले

पहिल्याच दिवशी पालघरात सर्वाधिक बरसला
पालघर : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण जून महिन्याने हुलकावणी दिल्यानंतर काल बुधवारपासून पालघर व पूर्ण परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. पालघरमध्ये सर्वाधिक १२६ मि. मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी पावसाची नोंद मोखाड्यात अवघी २.८० मि.मी. नोंदविण्यात आली आहे, त्यामुळे कही खुशी, तर कही गम अशी परिस्थिती आहे.
शेतकऱ्यांसह शहरी व ग्रामीण भागातील जनता ज्या पावसाची चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत होती, तो पाऊस अखेर काही काळ जोरदार वाऱ्यासह कोसळू लागल्याने पालघर तालुक्याने नि:श्वास टाकला आहे. नियोजित नवीन पालघर जिल्हा, जव्हार, विक्रमगड, वाडा, मोखाडा, तलासरी या भागातील अनेक पाड्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा अजुनही सुरू असला तरी पालघर तालुक्यातील एकही गाव पाड्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ उद्भवलेली नाही. खरिपाची लागवड लांबणीवर पडली असली तरी कालपासून पावसाने जोर धरल्याने येत्या काही दिवसात या लागवडीला सुरूवात होणार असल्याचे शेतकरी प्रकाश पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)