Join us  

वर्सोवा विधानसभा : अल्पसंख्याक मते निर्णायक ठरण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 3:36 AM

बहुभाषिक वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे सध्या भाजपच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर प्रतिनिधित्व करतात.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : बहुभाषिक वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे सध्या भाजपच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर प्रतिनिधित्व करतात. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी मागणी सेनेतून जोर धरत असली तरी त्याचा निर्णय वरीष्ठ पातळीवरच होणार आहे. हा निर्णय काहीही झाला तरी अल्पसंख्याक मतेच या मतदारसंघाचे भवितव्य ठरवणार आहे.उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंबोली विधानसभा मतदारसंघाचे २००९ मध्ये वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम असे विभाजन झाले. मालाड क्रीक ब्रिजपासून ते वर्सोवा खाडीपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. २००९ मध्ये वर्सोव्यातून काँग्रेसचे आमदार बलदेव खोसा यांनी येथून बाजी मारली होती.एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेस आघाडीच्या संजय निरुपम यांचा दारुण पराभव केला होता. कीर्तीकर यांनी २०१४ मध्येच कॉंग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी युती तुटली. त्यावेळी येथून भाजपच्या तिकीटावर डॉ. भारती लव्हेकर निवडून आल्या. शिवसेनेच्या उमेदवार राजुल पटेल यांचा निवडणूक अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने रद्द केला. त्याची खंत आजही शिवसैनिकांमध्ये दिसते.या निवडणुकीत डॉ. भारती लव्हेकर यांना ४९१८२ मते मिळाली. काँग्रेसचे बलदेव खोसा यांना २२७८४ मते मिळाली. तर येथून प्रथमच लढणा-या एमआयएमला २०१२७ मते मिळाली होती, तर मनसेला मते १४५०८ पर्यंत मिळालेली होती.(उद्याच्या अंकात वाचा - वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ)दृष्टिक्षेपात राजकारणगेली साडेचार वर्षे भाजप व शिवसेनेत श्रेयवादाची लढाई होती. आगामी निवडणुकांसाठी युती करण्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. २०१४ पूर्वी येथे भाजपचे अस्तित्व नव्हते. २०१९च्या पाच वर्षांच्या काळात आमदार लव्हेकर यांनी येथे छाप पाडली आहे.या मतदारसंघात शिवसेनेची सुद्धा मजबूत पक्कड असल्याने महायुतीच्या गठबंधनात २०१७च्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या एकुण मताच्या जोरावर हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी आग्रही मागणी विभागप्रमुख व आमदार अनिल परब यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश)फणसे, महिला विभागसंघटक राजुल पटेल, नगरसेवक राजू पेडणेकर यांची नावे प्रामुख्याने शिवसैनिकांमध्ये चर्चेत आहेत. राज ठाकरे यांनी इव्हीएम विरोधात भूमिका घेतली आहे.वर्सोवा येथून काँग्रेसच्या १४ इच्छुक उमेदवारांनी तिकिट मिळण्याची मागणी केली आहे. त्यात महेश मलिक, चंगेज मुलतानी, रईस लष्करिया, मोहसिन हैदर, माजी आमदार बलदेव खोसा, किरण कपूर हे प्रमुख दावेदार आहेत. या मतदारसंंघातून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव-राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा यांनीही आघाडीची उमेदवारी मिळावी अशी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेचा येथून उमेदवार कोण असणार, काँग्रेस आघाडीत मनसेला कोणत्या जागा मिळणार हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत.

टॅग्स :वर्सोवामुंबईमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019