Join us  

आवक वाढली तरी भाज्यांचे दर चढेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 4:53 AM

मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असली, तरी बाजारभाव अद्याप कमी झालेले नाहीत. पुढील आठवड्यात आवक वाढली तरच दर कमी होतील

नवी मुंबई : मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असली, तरी बाजारभाव अद्याप कमी झालेले नाहीत. पुढील आठवड्यात आवक वाढली तरच दर कमी होतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे दुधाचा तुटवडाही सुरूच आहे.मुंबईमध्ये एका आठवड्यापासून भाजीपाल्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होऊ लागली आहे. शनिवारी मार्केटमध्ये ९६ ट्रक व ५८७ टेम्पोंमधून भाजीपाला विक्रीसाठी आला. आवक चांगली झाली असली तरी श्रावणामुळे मागणी वाढली असल्यामुळे दर अद्याप कमी होऊ शकले नाहीत. होलसेल मार्केटमध्ये एक आठवड्यापूर्वी भेंडी २४ ते ३४ रुपये किलो दराने विकली जात होती, ते दर ४० ते ४८ रुपये किलो एवढे झाले आहेत. सर्वाधिक दर फ्लॉवरचे वाढले आहेत. १० ते १४ रुपये किलो दराने विक्री होणाºया फ्लॉवरचे दर होलसेल मार्केटमध्येच ६० ते ९० रुपयांवर गेले असून तब्बल सहा पट वाढ झाली आहे. काकडीचे दरही जवळपास दुप्पट झाले आहेत.सांगली, कोल्हापूर व कर्नाटकमधून येणा-या भाजीपाल्याची आवक पूर्णपणे थांबली आहे. सद्य:स्थितीमध्ये पुणे, नाशिक परिसरातून व गुजरातवरून माल विक्रीसाठी येत आहे. विक्रीसाठी आणलेल्या भाजीमध्ये खराब मालाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे दर वाढत असल्याची माहिती किरकोळ विक्रेत्यांनी दिली.दूध संकट कायमकोल्हापूर व सांगलीमधून अद्याप दूधपुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे मुंबई व ठाणे परिसरामध्ये ४० टक्के दुधाचा तुटवडा कायम आहे. सद्य:स्थितीमध्ये गुजरात, पुणे व इतर ठिकाणांहून जास्तीतजास्त दूध मुंबईतउपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे. याशिवाय छोट्या दूध संकलन केंद्रांनीही जादादूध उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. पुढील एक आठवडा दूधपुरवठा सुरळीत होणार नसल्याची माहिती दूधविक्रेत्यांनी दिली.

टॅग्स :भाज्यामुंबई