Join us  

मुंबई, पुणेसह राज्यात भाजीपाला व किराणा मालाची आवक सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 12:53 PM

राज्यातील नवी मुंबईतील वाशी मार्केट, पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि नागपुरातील कळमणा मार्केट यार्डामध्ये फळ व भाजीपाल्याची पुरेशा प्रमाणात आवक झाली आहे.

मुंबई : राज्यातील नवी मुंबईतील वाशी मार्केट, पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि नागपुरातील कळमणा मार्केट यार्डामध्ये फळ व भाजीपाल्याची पुरेशा प्रमाणात आवक झाली आहे. त्याचप्रमाणे सर्व महसूल विभागातील किराणा व औषध दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू व औषधांची आवक सुरू आहे. राज्यात कुठेही अन्नधान्य, फळभाजीपाला आणि औषधांचा  तुटवडा नसल्याची माहिती राज्य शासनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची १८३ वाहनातून आवक. नवी मुंबई  वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८३ गाड्या भाजीपाला, ९६वाहनाद्वारे कांदे- बटाटे आणि  ३१८ वाहनाद्वारे फळांची आवक झाली आहे.  त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरात ३२४गाड्यातून भाजीपाला व फळांचा थेट पुरवठा करण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या ६१२ टेम्पू आणि छोट्या वाहनातून थेट शहराच्या विविध केंद्रावर फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे.   

पुण्यात १०हजार क्विंटल भाजीपाला व कांद्याची आवक. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि उपनगरातील बाजार समितीच्या आवारात भाजीपाला विक्रीचे काम सुरळितपणे सुरु असून या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग  आणि स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत.  गुलटेकडी येथील मुख्य मार्केट यार्ड आणि मोशी, मांजरी, खडकी  येथील उपबाजार समितीमध्ये एकूण ४६७ वाहनामधून कांदे, बटाटे आणि भाजीपाल्याची सुमारे दहा हजार क्विंटल आवक झाली आहे. नागपूरमधील कळमणा  येथेभाजीपाला, कांदे, बटाटे, लसून तसेच फळे यांची आवक झाली. राज्यातील प्रमुख शहरात भाजीपाला व फळे यांची आवक सुरळितपणे सुरु आहे,  असे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कळविण्यात आले आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी किराणा दुकान असोसिएशन व मेडिकल असोसिएशन यांच्या संपर्कात असून किराणा दुकान व औषध दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या मालाचा पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. सध्या सर्वत्र  किराणा दुकान व औषध दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूचा पुरवठा शंभर टक्के आहे.

टॅग्स :अन्नभाज्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस