Join us  

Veer Savarkar: “महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत असे मला वाटत नाही”; रणजीत सावरकरांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 3:56 PM

Veer Savarkar: मूळात राष्ट्रपिता ही संकल्पनाच मला मान्य नाही, असे रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे. 

ठळक मुद्देया देशाला ५ हजार वर्षांची दीर्घ परंपरा आहेआपल्या देशात कोणतीही एक व्यक्ती राष्ट्रपिता होऊ शकत नाहीसावरकरांना राष्ट्रपिता घोषित करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याविषयीच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर (Ranjit Savarkar) यांनी अत्यंत परखड शब्दांत याविषयीची आपली भूमिका मांडली आहे. या देशाला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे आणि या देशाच्या उभारणीत अनेकांचे योगदान आहे. त्यामुळे कुणी एक व्यक्ती देशाचे राष्ट्रपिता होऊ शकत नाही. त्यामुळे महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे भारताचे राष्ट्रपिता आहेत असे मला वाटत नाही. मूळात राष्ट्रपिता ही संकल्पनाच मला मान्य नाही, असे रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे. 

महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला होता, असा दावा राजनाथ यांनी केला होता. यानंतर, इतिहासाचा विपर्यास करण्याचे काम हे लोक करत आहेत. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस हे लोक महात्मा गांधी यांच्या ऐवजी सावरकरांना राष्ट्रपिता घोषित करतील, या शब्दांत एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार निशाणा साधला होता. ओवेसी यांच्या वक्तव्याला रणजीत सावरकर यांनी प्रत्युत्तर दिले असून, एएनआयशी बोलताना आपली भूमिकाही स्पष्ट केली. 

भारतासारख्या देशाला ५ हजार वर्षांची दीर्घ परंपरा

भारत हा केवळ ४० किंवा ५० वर्षे जुना देश नाही. या देशाला ५ हजार वर्षांची दीर्घ परंपरा आहे. हजारो असे लोक आहेत, ज्यांनी या देशाच्या उभारणीत योगदान दिले आहे, मात्र ते लोक आज विसरले गेले आहेत. आपल्या देशात कोणतीही एक व्यक्ती राष्ट्रपिता होऊ शकत नाही. महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत, असे मला वाटत नाही. सावरकरांना राष्ट्रपिता घोषित करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. मूळात राष्ट्रपिता ही संकल्पनाच मला मान्य नाही, असे रणजीत सावरकर यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, भाजप नेते आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, अंदमानच्या तुरुंगात कैद असताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच वीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका दाखल केली होती, असे म्हटले आहे. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. 

टॅग्स :विनायक दामोदर सावरकरमहात्मा गांधी