Join us

Vedanta Group : सिटी ऑफ ड्रीम... मुंबईच्या स्टेशनवर उतरलो तेव्हा हातात जेवणाचा डबा अन् चादर होती, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 19:08 IST

Vedanta Group : वेदांता समुहाचे प्रमुख अनिल अग्रवाल हे बिहारहून मुंबईच्या तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनसवर आले. वयाच्या 20 व्या वर्षी डोळ्यात स्वप्न घेऊन ते आले होते.

मुंबई - राजधानी मुंबई म्हणजे स्वप्न नगरी, कित्येकांच्या स्वप्नांना अर्थ देत स्वप्नपूर्ती करणारं शहर म्हणजे मुंबई. कुणी मुंबईला माया नगरी म्हणतं, कुणी क्राईम सिटी म्हणतं, कुणी सिटी ऑफ गँगवार म्हणतं. तर, कुणी पोटाला भाकरी देणारं गाव म्हणतं. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात अनेकजण स्वप्न घेऊन येतात. त्यापैकीच एक म्हणजे अनिल अग्रवाल. अनिल अग्रवाल हे केवळ एक डबा आणि चादर घेऊन मुंबईला आले होते, या मुंबईने त्यांचं नशिबच बदलून टाकलं. 

वेदांता समुहाचे प्रमुख अनिल अग्रवाल हे बिहारहून मुंबईच्या तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनसवर आले. वयाच्या 20 व्या वर्षी डोळ्यात स्वप्न घेऊन ते आले होते. मुंबईतील या व्हिक्टोरिया टर्मिनसचा फोटो शेअर करत अग्रवाल यांनी थोडक्यात आपला संघर्षमय जीवनप्रवास उलगडला आहे. मला आजही आठवतंय, ज्यादिवशी मी बिहार सोडून मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनसवर पोहोचलो, तेव्हा हातात एक जेवणाचा डबा आणि चादर होती. त्यासोबतच, होती मोठं होण्याची स्वप्न. मुंबईत अनेक गोष्टी या पहिल्यांदाच पाहात होतो. काळी-पिवळी टॅक्सी, डबल डेकर बस तेव्हाच मी पाहिली. सिटी ऑफ ड्रीमलाही पहिल्यांदाच पाहात होतो, असे अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन सांगितले. 

मी मुंबईला आणि या गोष्टींना केवळ चित्रपटातच पाहिलं होतं. जर ध्येयवादी बनून तुम्ही पहिलं पाऊल टाकाल, तर तुम्हाला तुमचं यशाचं शिखर नक्कीच गाठता येईल. म्हणूनच, मी युवकांना कष्टाने पुढे जाण्याचं सांगतो, असेही अग्रवाल यांनी म्हटलं आहे. 

कोण आहेत अनिल अग्रवाल

अनिल अग्रवाल यांनी वयाच्या 20 व्या वर्षी बिहार सोडलं होतं. त्यावेळी, 1970 सााली भंगारच्या दुकानात वस्तू विक्रीपासून सुरूवात केली होती. तब्बल 10 वर्षांच्या मेहनतीला फळ मिळाले, त्यामुळे 1980 साली त्यांनी स्टरलाईट इंडस्ट्रीजची स्थापना केली. 1990 च्या दशकात तांबे या धातूला रिफाईन करणारी स्टरलाईट इंडस्ट्रीज ही देशातील पहिली खासगी कंपनी होती. हीच कंपनी पुढे जाऊन वेदांता रिसोर्सेज लिमिटेड नावाने आणि सध्याच्या वेदांता ग्रुप नावाने उद्योगविश्वात स्थीर झाली. वेदांता ग्रुप ही सध्या देशातीलच नाही, तर जगातील महत्वाच्या खनीज उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. लोह, अयस्क, अॅल्युमीनियमसह कच्च्या तेलांच्या उत्पादनाचंही काम ही कंपनी करते.

वेदांता लिमिटेड कंपनीचं आजचं मार्केट भागभांडवल 1.36 लाख कोटी रुपये एवढं आहे. फोर्ब्ज मॅगझीनच्या आकडेवारीनुसार अनिल अग्रवाल यांची नेटवर्थ 3.9 अब्ज डॉलर म्हणजेच 29,275 कोटी रुपये एवढी आहे. अनिल अग्रवाल हे वेदांता ग्रुप्सचे चेअरमन आहेत. 

टॅग्स :मुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसव्यवसाय