नाताळसाठी वसईकर सज्ज
By Admin | Updated: December 24, 2014 22:41 IST2014-12-24T22:41:54+5:302014-12-24T22:41:54+5:30
नाताळ म्हणजे बाळ येशूंचा जन्मदिवस व तो मोठ्या आनंदाने साजरा करण्याकरीता ख्रिस्ती बांधव नाताळच्या अगोदर किमान १५ दिवस तयारीला लागतात.

नाताळसाठी वसईकर सज्ज
वसई : नाताळ म्हणजे बाळ येशूंचा जन्मदिवस व तो मोठ्या आनंदाने साजरा करण्याकरीता ख्रिस्ती बांधव नाताळच्या अगोदर किमान १५ दिवस तयारीला लागतात. आज मध्यरात्री सामूहिक प्रार्थना करण्यात येते व सर्वांना ख्रिस्त प्रसाद वाटण्यात येतो. या दिवशी ख्रिस्ती नागरीक अनेक गोड पदार्थ तयार करीत असतात. यासाठी लागणारी सर्व सज्जता झाली आहे.
नाताळीस या लॅटीन शब्दावरून नाताळ हा शब्द जन्माला आला. नाताळच्या दिवशी येशूंच्या सन्मानार्थ उपासना विधी साजरा करण्यात येतो. या दिवशी ख्रिस्ती बांधव आपल्या अंगणात नाताळ गोठा तयार करतात. या गोठ्यात येशंूची आई मरीया, वडील योसेफ, तीन राजे, मेंढपाळ व जनावरे अशा देखाव्याचा समावेश असतो. या गोठ्याचे नाताळच्या दिवशी अनावरण केले जाते व बायबलमधील ख्रिस्त जन्माबाबतचे उतारे मुले वाचतात. यावेळी प्रार्थना व नाताळगीते म्हटली जातात. संत फ्रान्सिस आॅफ असीसी याने सर्वप्रथम नाताळ गोठ्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. सन १२२३ साली संत फ्रान्सिस यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने इटली मधील एका चर्चमध्ये हा गोठा तयार केला. बाळ येशंूच्या आपत्तीग्रस्त व गरीब जीवनाला कसा प्रारंभ झाला तसेच त्यांनी दया-माया व क्षमाशीलता कशी व्यक्त केली याचे दर्शन या गोठ्यातून होत असते. ख्रिसमस ट्री म्हणजे सफरचंदे लटकलेले झाड त्यास पारादिस वृक्ष असे संबोधण्यात येते. या वृक्षाच्या माध्यमातून अॅडम व ईव्ह यांची उत्पत्ती व पतन यांचे दर्शन घडविण्यात येत असते. या सणानिमित्त बाळगोपाळांकरीता विविध उपक्रम राबविण्यात येते. यामध्ये सांताक्लॉज हा बाळगोपाळाचा आकर्षक असतो. या सांताक्लॉज बाबाचे युरोपात फार आकर्षण आहे. लहान मुले रात्री आपल्या खाटेला पायमोजे अडकवून ठेवतात. रात्री मुले झोपली की सांताक्लॉज बाबा घरात येतो व पाय मोज्यात आकर्षक भेटी ठेवतो. गावातील एखादा तरूण सांताक्लॉजचा पोशाख करतो व मुलांना भेटी वाटत फिरतो.
नेदरलँड देशामध्ये सांताक्लॉज पांढऱ्या घोड्यावरून येतो. स्पेनमध्ये तो उंटावरून येतो. या सांताक्लॉज बाबाचे आगमन व मिळणाऱ्या भेटी यामुळे मुले आनंदीत होतात. स्विर्त्झलंडमध्ये हा सांताक्लॉज बाबा तांबड्या व काळ्या पोशाखात येतो. नाताळच्या निमित्ताने जगभरात प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. या दिवशी आपले निवासस्थान सजवण्याकरीता ख्रिस्ती समाज वारेमाप पैसा खर्च करतो. वसईच्या समुद्रकिनारी असलेल्या गावामध्ये ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने राहतात. ग्रामीण भागातील ख्रिस्ती बांधव यथाशक्तीनुसार हा सण साजरा करतात. मध्यरात्री चर्चेसमध्ये प्रार्थना झाली की ख्रिस्ती बांधव नाताळसण साजरा करण्यास सुरूवात करतात. (प्रतिनिधी)