वाशीत चोरांची हातसफाई
By Admin | Updated: December 20, 2014 01:18 IST2014-12-20T01:18:20+5:302014-12-20T01:18:20+5:30
घरातील सर्व व्यक्ती लग्नासाठी पंजाब येथे गेल्या असताना चोरांनी घरफोडी करून तब्बल ७ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना वाशीत घडली आहे

वाशीत चोरांची हातसफाई
नवी मुंबई : घरातील सर्व व्यक्ती लग्नासाठी पंजाब येथे गेल्या असताना चोरांनी घरफोडी करून तब्बल ७ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना वाशीत घडली आहे. सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने चोरट्यांना हातसफाई करण्यास फारसा अडथळा आला नाही.
वाशी सेक्टर १४ येथील सद्गुरू सोसायटीमध्ये राहणाऱ्या तनुजा अगरवाल (५८) यांच्या घरी ही चोरी झाली. या घटनेत त्यांच्या घरातील ३० तोळे सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेलो. मुलाच्या लग्नानिमित्ताने संपूर्ण कुटुंब पंजाबमधील जालंदर येथे मूळ गावी गेले होते. त्यामुळे १३ डिसेंबरपासून त्यांचे घर बंद होते. मुलाचे लग्न उरकून गुरुवारी नववधूला घेऊन ते घरी परत आले. बंद घराचे कुलूप तोडून, आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने दागिने लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लग्नासाठी गावाकडे जाताना त्यांनी काही दागिने घरामध्येच ठेवले होते तर मोजकेच दागिने सोबत नेल्याचे ते बचावले. अगरवाल यांच्या घरात सीसीटीव्ही अथवा इतर कोणतेही सुरक्षेचे उपकरण नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पाठारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)