आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वाशीत मेळावा
By Admin | Updated: June 18, 2015 01:03 IST2015-06-18T01:03:23+5:302015-06-18T01:03:23+5:30
पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिडकोच्या वतीने येत्या रविवारी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात योग मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वाशीत मेळावा
नवी मुंबई: पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिडकोच्या वतीने येत्या रविवारी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात योग मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्यावेळी म्हणजे सकाळी ७.०० वाजता या योग शिबिराला सुरुवात होणार आहे. द आर्ट आॅफ लिव्हिंग, दिव्य पतंजली योगपीठ, सहजमार्ग, विपश्यना, ब्रह्मकुमारीज अशा मान्यवर संस्था यात सहभागी होणार आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला आहे. सिडकोनेही या दिनानिमित्त नवी मुंबईकरांसाठी भव्य योग मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सर्वांना प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. पावसाळ्यात नागरिकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून सिडकोने हा मेळावा वाशी रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रदर्शन केंद्रात आयोजित केला आहे. सकाळी ६.३० ते ७.००पर्यंत पहिल्या योगसत्राच्या बैठकीची पूर्वतयारी होईल. पहिले सत्र ७.०० ते ८.०० या वेळात होईल. त्यानंतर दुसऱ्या सत्रात १०८ सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. हे सत्र सकाळी ९.०० वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर पुढच्या एक तासात सहज मार्ग या ध्यानधारणा पध्दतीचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. अधिकाधिक नागरिकांना या योग शिबिराचा लाभ घेता यावा म्हणून सकाळचे पहिले सत्र पुन्हा १०.०० ते ११.०० या दरम्यान घेतले जाईल. त्यानंतर नवी मुंबईतील पोलीस दलाकरिता पतंजली योगपीठातर्फे विशेष योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १२.०० ते १.०० या काळात प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येईल. (प्रतिनिधी)