Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाशी ते मानखुर्द प्रवास आजपासून होणार जलद; वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या बाजूचे आज लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:15 IST

हा पूल १९९४ मध्ये वाहतुकीला सुरू करण्यात आला होता

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या वाशी खाडी पुलाच्या मुंबई दिशेकडील पुलाच्या उद्घाटनासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या खाडीपुलाचे गुरुवारी ५ जून रोजी लोकार्पण होणार आहे. त्यामुळे आता वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास जलद होणार आहे.

सायन पनवेल मार्गावर मानखुर्द आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीवर सहा पदरी पूल आहे. हा पूल १९९४ मध्ये वाहतुकीला सुरू करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत या रस्त्यावरील वाहतूक वाढल्याने हा पूल अपुरा पडू लागला. परिणामी वाशी टोल नाका भागात वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे पुलावर होणारी कोंडी सोडविण्यासाठी ठाणे खाडी पुलाच्या दोन्ही बाजूंना समांतर असे प्रत्येकी तीन मार्गिकांचे आणखी दोन पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) उभारण्यात आले आहेत. यातील मानखुर्दहून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणारा पूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. 

वाशीकडून मानखुर्द दिशेला येणाऱ्या वाहनांसाठी उभारलेल्या पुलाचे काम दीड ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, त्याचे लोकार्पण रखडले होते. मात्र आता हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या मार्गावर ऐन कार्यालयीन वेळेत होणाऱ्या कोंडीपासून सर्वांची सुटका होणार आहे.

  • कोटी प्रकल्पासाठी खर्च - ५५९
  • मीटर पुलांची लांबी - १८३७ 
  • मुंबईकडील पोहोचमार्ग - ३८० मीटर
  • मुंबईकडील पुलाच्या एकूण पिअर्स - २४ 
  • मुंबईकडील पुलासाठी वापरलेले एकूण सेगमेंट - ४८८ 
  • पूल - प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन पूल 
टॅग्स :मुंबईनवी मुंबई